Amravati : कुलरचा शॉक लागून आईसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू Pudhari Photo
नाशिक

Suspicious Death | व्यसनमुक्ती की विषबाधा? कंधाणे आणि निकवेलच्या दोन तरुणांचा दुर्दैवी अंत; पोलीस तपासाला वेग

Suspicious Death | तालुक्यातील तिळवण येथील कळवण रस्त्यावरील बारी परिसरात शनिवारी (दि. ९) सायंकाळी दोन युवकांचे मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

सटाणा : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील तिळवण येथील कळवण रस्त्यावरील बारी परिसरात शनिवारी (दि. ९) सायंकाळी दोन युवकांचे मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोघांच्या मृतदेहाजवळ रस्त्याच्या कडेला त्यांची दुचाकीही आढळली. यातील एक मयत कंधाणे येथील, तर दुसरा निकवेल येथील आहे.

रविवारी (दि.१०) सकाळी शवविच्छेदनानंतर दोघांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी सटाणा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील कंधाणे येथील राजेंद्र लक्ष्मण सोनवणे (४३) व निकवेल येथील सचिन केशव जाधव (३९) हे दोघे मित्र होते.

सोनवणे मोलमजुरी, तर जाधव फर्निचरची कामे करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दोघांनाही मद्याचे व्यसन होते. त्यामुळे तालुक्यातील एका मांत्रिकाकडे ते व्यसनमुक्तीसाठी गेले होते, असे कुटुंबीयांकडून समजले. दोघांच्या मोबाइल कॉल रेकॉर्डवरूनही ही बाब स्पष्ट झाल्याचे संबंधितांनी सांगितले. परत येत असतानाच बारीत दोघांवर मृत्यू ओढवला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. यातील एकाच्या तोंडातून रक्त आल्याचे दिसून आले.

एकाचवेळी दोघांचा मृत्यू झाल्याने हा विषबाधेचा प्रकार असावा, असा संशय व्यक्त होत आहे. याबाबत पोलिसांना समजताच घटनास्थळी जात दोघांचे मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. सकाळी शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यांचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

त्या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळणार आहे. दोघांना कदाचित दारू सोडण्यासाठी घेतलेल्या औषधामुळेच विषबाधा झाली असावी, असा कयास व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT