Satana Smashanbhumi  
नाशिक

Satana Smashanbhumi | आरई येथील स्मशानभूमीत आढळले अघोरी पूजेचे साहित्य; सटाणा तालुक्यात खळबळ

Satana Smashanbhumi | खमताणे, भाक्षीपाठोपाठ प्रकार; चौकशीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सटाणा : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील आरई येथील स्मशानभूमीत सोमवारी (दि. १६) 'कथित' अघोरी पूजाविधीचे साहित्य आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अशा घटना वारंवार घडत असल्याने या प्रकारांमधील नेमके कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

आरई येथील काही ग्रामस्थ सोमवारी सकाळी रक्षाविसर्जनाच्या कार्यक्रमासाठी स्मशानभूमीत गेले असता, अंत्यविधीच्या जागेजवळ पूजाविधीसाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले. यामुळे ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली. अंधश्रद्धेतून हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच्या खमताणे येथील स्मशानभूमीतही अशा प्रकारचे साहित्य आढळून आले होते. या साहित्यासोबत काही महिला व पुरुषांची छायाचित्रे मिळाली होती. त्यापूर्वी भाक्षी येथील रस्त्यावरील चौफुलीवर अशाच प्रकारचे साहित्य आढळле होते. तेथे बळी दिलेला कोंबडाही सापडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी सटाणा शहरातील अमरधाममध्येही असाच प्रकार उघडकीस आला होता. त्यावेळी सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी पोलिसंकडे तक्रार केली होती. ग्रामीण भागासह शहरात अशा घटना सातत्याने समोर येत असल्याने अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या या प्रकाराबाबत चिंता व्यक्त होत आहे. आरई येथील घटनेची पोलिसांनी सखोल चौकशी करावी. तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

अंधश्रद्धेचे आव्हान कायम

ग्रामीण भागात शिक्षण and आधुनिकीकरणाचा प्रसार होत असतानाही अंधश्रद्धेचे प्रकार कायम असल्याचे या घटनांमधून दिसून येते. विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्यांना बुवाबाजी, भगतगिरी करणाऱ्यांकडून विधीचे मार्ग सुचवले जातात. यातून नागरिकांची दिशाभूल होण्याची शक्यता आहे. अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करण्यासोबत अशा प्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्यांवर कारवाईची गरज व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT