नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वणी गडावर सप्तशृंगी देवी येत्या २६ मार्चपासून चैत्रोत्सव सुरू होत असून, त्यानिमित्त गडावर येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासन व ट्रस्टतर्फे सूक्ष्म नियोजन सुरू केले आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गडावर व पायथ्याशी आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय पथके, प्राथमिक उपचार केंद्रे व रुग्णवाहिका सेवा २४ तास सज्ज ठेवण्यात येणार आहे.
कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये, तीव्र उन्हामुळे आगीसारखी ददैवी घटना घडू नये म्हणून अग्निशमन दल पथक कार्यान्वित करण्यात येणार आहे. भाविकांना देवीचे सहज दर्शन घेता यावे, चोरी-छेडछाडीसारखे गैरप्रकार घडू नये म्हणून पोलिस विभागातर्फे पुरेसे पोलिस, होमगार्ड तसेच स्वयंसेवकांची नियुक्ती करून त्यांचे संयुक्त पथक कार्यरत राहणार आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील याबाबत नियोजन करत आहेत. केवळ नाशिक जिल्हाच नव्हे, तर राज्यभरातील वेगवेगळ्या भागांतून भाविक पदयात्रेने व वाहनांनी येतात. त्यामुळे गर्दी नियंत्रणासाठी ठिकठिकाणी बॅरिकेडिंग, रांग व्यवस्थापन व सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहे.
यात्रेत लहान मुले, मुली किंवा वृद्ध व्यक्ती हरवतात. अशा हरवलेल्या व्यक्तींसाठी स्वतंत्र मदत केंद्र कार्यान्वित केले जाणार आहे. यात्रेदरम्यान भाविकांसाठी भोजन, पिण्याचे पाणी, स्वच्छता व वीजपुरवठ्याची योग्य व्यवस्था सुनिश्चित करण्यात येत आहे. तसेच स्वच्छतागृहे, योग्य ठिकाणी दिशादर्शक फलके, वृद्ध व अपंग भाविकांसाठी व्हीलचेअर, रॅम्प आदी सुविधांची उपलब्धता केली जात आहे. वैद्यकीय सेवेसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयामार्फत वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका व आपत्कालीन खाटांची व्यवस्था सज्ज करण्यात आले आहे.
खासगी वाहनांना गडावर प्रवेश बंद
सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस विभागातर्फे काटेकोर नियंत्रण ठेवण्याचे नियोजन आहे. वाहतूक व्यवस्थेनुसार खासगी वाहनांना गडावर प्रवेश बंद ठेवण्यात येणार असून, नांदी येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. बसेससाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. यात्रा मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्यात येत आहे.
हे अधिकारी करताहेत नियोजन
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक जिल्हाधिकारी कश्मिरा संखे, अपर जिल्हाधिकारी (मालेगाव) देवदत्त केकाण, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, तहसीलदार (कळवण) रोहिदास वारूळे,
कळवण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी वंदना सोनवणे, उमेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता रोहिणी वसावे, भारत संचार निगम लिमिटेडचे निखिल शिरसाठ, महावितरणचे योगेश जगदाळे, सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टचे प्र. व्यवस्थापक संजय नेरकर, अॅड. ललित निकम यात्रेचे नियोजन करीत आहेत.
चैत्र महोत्सवातील यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूक्ष्म नियोजन करण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नियोजन सुरू आहे.- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी