नाशिक : राज्य शासनाने केलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून सन 2019 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे. त्यामुळे राज्य शासनाने पुन्हा कर्जमाफीचा निर्णय जरी घेतला तरी, या थकबाकीदारांना कर्जमाफीचा लाभ होणार नाही. त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने नव्याने आणलेल्या सामोपचार योजनेचा लाभ घ्यावे, असे आवाहन जिल्हा बॅंकेचे प्रशासक संतोष बिडवई यांनी सोमवारी (दि. ४) पत्रकार परिषदेत केले. योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून पहिल्याच दिवशी पाच थकबाकीदारांना याचा लाभ घेतला असून अंदाजे 25 लाखांची वसुली झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रशासक बिडवई यांनी नवीन सामोपचार योजनेची सविस्तर माहिती दिली. शेतकरी कर्जमाफीकडे डोळे लावून बसले आहे. शेतकरी संघटनेने कर्जमाफीसाठी रेटा लावला आहे. संपूर्ण व्याज माफ करून मुद्दलाचे समान हप्ते करून द्यावे, अशी आग्रही मागणी संघटनांनी लावून धरली आहे. असे असले तरी, दुसरीकडे जिल्हा बॅंक अडचणीत असल्याने वसुलीवर भर देत आहे. त्यासाठी जिल्हा बॅंकेने नवीन सामोपचार योजना आणली आहे.
यातून थकबाकी वसुली करणार असल्याचे प्रशासक बिडवई यांनी सांगितले. नवीन सामोपचार योजना फायदेशीर असून त्यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. मात्र तरीही कर्ज फेडण्यास उदासीनता दाखविली तर मग मात्र कायदेशीर मार्गाने वसुलीचा करण्याचा पर्याय खुला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. योजनेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी बॅंकेचे 450 अधिकारी व कर्मचारी मैदानात उतरणार आहे. गावो-गावी, वाड्या-वस्त्यांवर ते बैठका घेतली. थकबाकीदारांच्या घरी जाऊन त्यांना योजना समजावून सांगतील, असे नियोजन केले असल्याची माहिती त्यांनी दिली. सामोपचारला सोमवारी शेतक-यांचा प्रतिसाद लाभला. एकाच दिवशी पाच शेतक-यांनी जवळपास २५ लाख रूपये भरल्याचा दावा बिडवई यांनी केला. सटाणा, नामपूर, नांदगाव या भागातील प्रत्येकी एक तर मालेगाव तालुक्यातील दाेघा शेतकऱ्यांचा यात समावेश आहे.
२०१९ मध्ये झालेल्या कर्जमाफीचा फायदा १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत कर्ज घेतलेले आणि ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत असलेल्या अल्पमुदत पीक कर्जदारांना झाला आहे. विशेष म्हणजे, २०१६-१७ मध्ये सर्वाधिक म्हणजे १७२० कोटी रुपये कर्जवाटप झाले होते. कर्जमाफीचा फायदा याच कालावधीतील शेतकऱ्यांना झाला होता. त्यामुळे भविष्यात सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तरी त्याचा फायदा या शेतकऱ्यांना मुळीच होणार नाही. तरीही कर्ज फेडण्यास उदासीनता दाखविली तर मग मात्र कायदेशीर मार्गाने वसुलीचा करण्याचा पर्याय खुला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
३० जून २०२४ अखेर ५६ हजार ७९७ शेतकऱ्यांकडे ९९२ कोटी नऊ लाख ५६ हजार रुपये थकित आहे. त्यापैकी ३७ हजार ७५१ शेतकऱ्यांकडून ७३३ कोटी ६० लाख ४९ हजार रुपये वसूल करण्यासाठी कलम १०१ नुसार दाखले प्राप्त झाले आहेत. २६ हजार ७८५ शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर बोजा चढविण्यासाठी कार्यवाही सुरू आहे तर, २४ हजार ५२१ शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यांवर प्रत्यक्षात बोजा चढविण्यात आला आहे. चार हजार ७८५ शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर बोजा चढविणे शिल्लक आहे. सहा हजार ४३५ शेतकऱ्यांकडून ७१ कोटी ७९ लाख ३९ हजार रुपये वसूल करण्यासाठी सहाय्यक निबंधकांकडून कलम १०१ चे दाखले अद्याप मिळालेले नाही असे बिडवई यांनी सांगितले.