Sales of Paithani worth crores on Diwali
येवला : संतोष घोडेराव
ऐन दिवाळीच्या तोंडावर अतिवृष्टीमुळे पिके जमीनदोस्त झाल्याने ग्रामीण भागात काहीसा दिवाळीचा निरुत्साह असला तरी झालेले दुःख विसरून शेतकऱ्यांनी दिवाळीसाठी लागणाऱ्या पारंपरिक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. विशेषतः पैठणीचे माहेरघर म्हणून येवल्याचे ओळख असल्याने केवळ जिल्ह्यातूनच नव्हे, तर राज्यच्या विविध भागांतून ग्राहकांनी पैठणीसाठी मागील काही दिवसांपासून गर्दी केली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीदेखील पैठण्या खरेदीसाठी महिलांची लगबग दिसून आली. यामुळे येवल्याला पैठणी विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल झाली.
शहरात दिवाळी खरेदीचा मोठा उत्साह दिसत होता. किराणा माल, कपडे, दागिने, वाहने, विद्युत उपकरणे, पणती, रांगोळी, आकाशकंदील, फटाके, केरसुणी, बोळकी, पूजासाहित्य, तयार फराळ भेटवस्तूंच्या खरेदी करताना बाजारपेठ फुल्ल झाली होती. येथील शनिपटांगण व मुख्य बाजारपेठेसह शहरातील दुकानांत सलग तीन दिवसांपासून गर्दीचा उच्चांक होता. शनिपटांगण, मेन रोड, थिएटर रोड, बुरूड गल्ली, इंद्रनील कॉर्नर परिसरासह सर्वत्र खरेदीची एकच धूम दिसून आली.
पैठणीचं माहेरघर असलेल्या येवल्यात दिवाळीनिमित्ताने पैठणी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली. शहरातील प्रत्येक पैठणीच्या दालनामध्ये महिला वर्गांची लगबग होती. यातून कोट्यवधींची उलाढाल झाली. येवला पैठणी, सिल्क व सेमी पैठणीसह सर्व प्रकारच्या साड्यांना महिलांची पसंती होती. १५ हजारांपासून ते लाखो रुपयांपर्यंतच्या पैठण्या यंदा विकल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.