

नाशिक : त्र्यंबकेश्वर रोडवरील अतिक्रमण कारवाईला न्यायालयाने वैयक्तिक स्तरावर स्थगिती दिलेली आहे. असे असताना देखील आता 'एनएमआरडीए'ने आता घरे पाडण्याची नोटीस या भागातील नागरिकांना बजावली आहे. दिवाळी संपल्यानंतर लागलीच या कारवाईला सुरुवात होणार असून, घरावरही बुलडोझर फिरणार आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांना घर सोडण्याची नामुष्की आली आहे.
नाशिक महानगर विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) ने नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यालगतचे बांधकाम, पत्र्यांचे शेड पाडले आहेत. पेगलवाडी ते पिंपळगाव बहुला भागातील रहिवाशांनाही 'एनएमआरडीए'ने नोटीसा बजावल्या आहेत. दिवाळीनंतर ही घरे खाली करण्याची कारवाई सुरु होईल. त्यामुळे ऐन दिवाळीत घर खाली करावी लागणार असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. दरम्यान, एनएमआरडीएच्या कारवाई विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यांना वैयक्तिक स्तरावर स्थगिती मिळाली. परंतू पुढील सुनावणीत १८ नोव्हेंबर रोजी 'एनएमआरडीए' आपली बाजू न्यायालयासमोर मांडणार आहे. त्यात स्थगिती उठविली गेली तर सरसकट कारवाई सुरु केली जाणार आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर हा रस्ता सध्या ९ मीटर रुंदीचा आहे. साईडपट्टी ३ मीटरची असून एकूण १२ मीटरचा रस्ता सध्या अस्तित्त्वात आहे. या रस्त्याच्या मध्यापासून एका बाजूने ५० मीटर पर्यंतचे अतिक्रमण काढण्यात येत आहे. वाढीव रस्त्याची रुंदी ही एका बाजूने जास्तीत जास्त १५ मीटर इतकी असणार आहे. दोन्ही बाजूंनी मिळून ३० मीटर रस्ता होईल. मग शंभर मीटर जागा प्रशासन कशासाठी मोकळी करत आहे, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. या कारवाईविरोधात त्यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
अश्रू अनावर
बेळगाव ढगा, सहावा मैल येथील रहिवासी वामन गुंबाडे यांनी २०२० मध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर बांधले. पाच वर्षे याच घरात राहिल्यानंतर आता हेच घर पाडण्यासाठी एनएमआरडीने नोटीस बजावली आहे. दोन वेळा अधिकारी घरी येवून घर खाली करण्याची सूचनाही देऊन गेले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत घर खाली करण्याची वेळ गुंबाडे कुटुंबावर आली आहे. दिवाळीचा उत्साह कधीच मावळला आहे. घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नवीन घर शोधण्याचा तणाव जाणवत आहे. उघड्यावरील आपला संसार बघून महिलांना अश्रू अनावर होत आहेत.