kumbh-mela-nashik  Pudhari News Network
नाशिक

Sadhugram preparation Nashik | साधुग्रामसाठी प्रशासनाकडून तयारीला वेग

नाशिकमध्ये १४६८, तर त्र्यंबकेश्वरात ६८८ एकरांवर नियोजन

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आखाडे व साधू-महंतांसाठी साधुग्राम उभारले जाणार असून, ते मागील कुंभमेळ्यापेक्षा मोठे व सुसज्ज असणार आहे. त्यासाठी प्रशासनाने नाशिकमध्ये १४६८ एकरांवर २ हजार ४०० प्लॉट्स तयार केले आहेत, तर त्र्यंबकेश्वर येथे ६८८ एकरांवर ४७० प्लॉट्सचे नियोजन केले आहे. प्रयागराज महाकुंभानंतर नाशिक सिंहस्थात दहा ते बारा कोटी भाविक येण्याची शक्यता असल्याने पुन्हा नवीन जागांचा शोध सुरू आहे.

सिंहस्थ कुंभमेळाच्या तयारीला वेग आला असून, कोट्यवधी भाविक आणि संत-महंतांचे आखाडे यांच्यासाठी प्रशासन नियोजन करीत आहे. तसा आराखडाही तयार करण्यात आला आहे. पारंपरिक तपोवन परिसर अपुरा पडू शकतो म्हणून प्रशासन नवीन सिंहस्थाचे जागेचा शोध घेत आहे. नाशिकमध्ये तब्बल १४६८ एकर क्षेत्रावर साधुग्राम उभारण्याचे नियोजन असून, त्यात सुमारे २४०० प्लॉट्सची आखणी करण्यात आली आहे. या परिसराचे सहा सेक्टरमध्ये विभाजन करण्यात येणार असून, प्रत्येक प्लॉट ३०० ते ६०० चौरस मीटर आकाराचा असेल, तर १८८ एकर क्षेत्रावर चार सेक्टरमध्ये सुमारे ४७० प्लॉट्स उभारले जाणार आहेत.

आखाड्यांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रतिआखाडा पाच कोटींचा निधी, छोट्या संस्थानसाठी प्रतिसंस्थान १५ लाख रुपये, आखाड्यांच्या वीजदेयकाची प्राधिकरणाच्या माध्यमातून अदायगी, आखाड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या शिखर बैठकीत केली असल्याने हा सिंहस्थ अधिक भव्य-दिव्य होणार यात काही शंका नाही.

साधुग्राम विस्तारासाठी नव्या जागांचा शोध

भाविकांची संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने साधुग्रामसाठी नव्या जागांचा पर्याय पुढे आणला आहे. मिर्ची हॉटेल ते गोदावरी नदी संगम पुलालगतचा परिसर, टाकळी मलजल शुद्धीकरण प्रकल्पालगतची जागा, तपोवन ते नांदूरपर्यंतचा विस्तीर्ण पट्टा आणि छत्रपती संभाजीनगर महामार्गालगतची जमीन यांचा यात समावेश आहे. या भागांमध्ये वाहतूक सुविधा, पार्किंग, सुरक्षा यंत्रणा आणि तात्पुरत्या निवासव्यवस्थेची उभारणी शक्य असल्याचे प्रशासनाचे मत आहे. साधू व भाविकांना अधिक शिस्तबद्ध सुविधा देण्यासाठी या जागांचा उपयोग महत्त्वाचा ठरणार आहे.

तपोवनातील जागा अपुरी पडण्याची शक्यता

सिंहस्थ कुंभमेळ्यातील विक्रमी गर्दीच्या अंदाजामुळे प्रशासनाकडून काटेकोर नियोजन केले जात आहे. सध्या तपोवन आरक्षणातील ३०७ एकर जागा मनपाकडे असून, त्यातील २४ एकर क्षेत्र मनपाच्या ताब्यात आहे. उर्वरित २८३ एकर क्षेत्र अधिग्रहणासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र, सिंहस्थासाठी आवश्यक एकूण क्षेत्र तब्बल १४६८ एकर इतके असल्याने उपलब्ध जागा अपुरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या जागांचा शोध सुरू आहे.

या असतील सुविधा

  • निवासव्यवस्थेसह आधुनिक सुविधा उपलब्धतेवर भर

  • आरोग्य सुविधांसाठी रुग्णालये, आयसीयू रुग्णवाहिका आणि अग्निशमन यंत्रणा तैनात

  • ड्रोन, पोलिस नियंत्रण कक्ष आणि सार्वजनिक घोषणा प्रणाली कार्यरत

  • स्वच्छतेसाठी सार्वजनिक शौचालये, कचराकुंड्या, पाणी एटीएम आणि कचरा संकलन व्यवस्थेची उभारणी

  • भाविकांसाठी रेशन बूथ, बँका, एटीएम, पार्किंग तसेच स्वतंत्र वाहतूक मार्ग करण्याचे नियोजन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT