सिन्नर/वावी : पुढारी वृत्तसेवा
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील मलढोण शिवारात तब्बल १८ लाख रुपयांची लूट झाल्याची घटना ताजी असतानाच, पुन्हा याच परिसरात प्रवाशांची कार अडवून मारहाण करीत रोकड व सोन्याचे दागिने लुटल्याची गंभीर घटना समोर आली.
रात्रीच्या वेळी समृद्धी महामार्गावर वाहनांना लक्ष्य करून लुटीचे प्रकार सलग घडत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, महामार्गाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
नव्याने समोर आलेल्या घटनेत अर्टिगा कारमधून (एमएच ३८ एडी ८५४९) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडवून चोरट्यांनी मारहाण केल्याची घटना गुरुवारी (दि. २७) रात्री ११.४० च्या सुमारास घडली. या घटनेत चालक किरण खंदारे यांच्या खिशातील ७ हजार ३०० रुपये, कारच्या डिकीत असलेली ३४ हजार ५०० रुपयांची रोकड तसेच गळ्यातील सुमारे दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे ओमपान आणि पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा ऐवज लुटला.
लुटीवेळी प्रवाशांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मारहाण झाल्याचे समजते.
हिंगोली जिल्ह्यातील लोहगाव येथून ही कार मुंबईच्या दिशेने जात होती. अर्जुन खरात यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील केईएम रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी ते पत्नी व पुतण्यासह मुंबईकडे निघाले होते.
कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या पत्रावरून उपचारासाठी जात असताना रात्री ११.४० च्या सुमारास समृद्धी महामार्गावरील दुसंगवाडी शिवारात त्यांना लुटीला सामोरे जावे लागले. चालक किरण खंदारे यांच्या तक्रारीवरून वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, निफाड विभागीय पोलिस अधिकारी के. के. पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल मोरे, सिन्नर निरीक्षक श्रीराम पवार तसेच एमआयडीसी ठाण्याचे निरीक्षक बडगुजर यांच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांची पथके रात्री उशिरापर्यंत समृद्धी महामार्ग परिसरात तळ ठोकून होती.
वावीचे सहायक निरीक्षक आशिष शेळके यांनीही दिवसभर घटनास्थळाची पाहणी करून आरोपींच्या संभाव्य हालचालींचा माग घेण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळ परिसरातील उपलब्ध पुरावे, सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
पांडुरंग माने यांनी घटनेदरम्यान चोरट्यांचे चित्रीकरण मोबाइलमध्ये करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांच्या लक्षात येताच त्यांचा मोबाइल हिसकावून रस्त्यावर फेकून फोडण्यात आला. त्यानंतर चोरटे घटनास्थळावरून पसार झाले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत टोळीने केलेल्या या लुटीमुळे महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.
समृद्धी महामार्ग आणि वावी पोलिस ठाणे यांच्यातील अंतर प्रत्यक्षात कमी असले, तरी महामार्गावर पोहोचण्यासाठी पोलिसांना मोठा वळसा घ्यावा लागतो. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होतो. या पार्श्वभूमीवर वावी परिसरात समृद्धी महामार्गासाठी स्वतंत्र एक्झिट पॉइंट उपलब्ध करून देण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे.