पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा राज्य किंमत देखरेख आणि संसाधन युनिटमार्फत व्यापार मार्जिन सुसूत्रीकरण (टीएमआर) लागू केल्यानंतर, ओळखण्यात आलेल्या १३७ अनुसूचीबाह्य कर्करोगविरोधी औषधांच्या सुधारित किमती ९ नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत.
रसायन आणि खते मंत्रालयाच्या औषधनिर्माण विभागांतर्गत कार्यरत राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (एनपीपीए) औषधांमधील व्यापारी नफा तर्कसंगत करून ती रुग्णांना परवडणारी व्हावीत, यासाठी केलेल्या शिफारशीनुसार हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
ओळखण्यात आलेल्या औषधांमधील व्यापारी नफ्याचे नियमन करणे आणि औषधनिर्माण क्षेत्रातील किंमतविषयक नियमांचे पालन अधिक प्रभावी करणे, हा या उपाययोजनेचा उद्देश आहे.
यामुळे कर्करोगाच्या उपचारांचा आर्थिक भार कमी होण्यास आणि अत्यावश्यक कर्करोगविरोधी औषधांची उपलब्धता सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे.
उत्पादकांना २६ ऑक्टोबरपर्यंत सुधारित कमाल किरकोळ किमतीचा (एमआरपी) तपशील एनपीपीए आणि संबंधित राज्य औषध नियंत्रकांकडे सादर करावा लागेल. तसे न केल्यास, औषधे (कीमत नियंत्रण) आदेश, २०१३ अंतर्गत जास्त आकारलेली रक्कम वसूल करण्यासाठी एनपीपीए कारवाई करू शकते.
किरकोळ विक्रेते, वितरक, रुग्णालये आणि संस्थांना उत्पादकांनी दिलेल्या किंमत सूची व पूरक किंमत सूची ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक असेल. ही माहिती मागणी करणाऱ्या कोणालाही उपलब्ध करून द्यावी लागेल. या नियमांचे उल्लंघन झाल्यास एनपीपीएकडून कारवाई केली जाऊ शकते.