नाशिक : नियमित करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने एप्रिल ते जुलै २०२५ दरम्यान राबविलेल्या करसवलत योजनेचा लाभ तब्बल २.३६ लाख मिळकतधारकांनी घेतला असून, ४.९९ कोटींची करसवलत मिळवली आहे. या योजनेंतर्गत गेल्या चार महिन्यांत तब्बल १११ कोटी ९२ लाखांची घरपट्टी वसूल झाली असली, तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा घरपट्टी वसुलीत २.६९ कोटींची घट झाल्याचे चित्र आहे.
नियमित करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून करसवलत योजना राबविण्यात आली. याअंतर्गत एप्रिल महिन्यात कररकमेच्या आठ टक्के सवलत दिली गेली. या महिन्यात ४५.०२ कोटींची वसुली झाली.
एप्रिल पाठोपाठ मे महिन्यातही आठ टक्के सवलतीचा दर कायम ठेवला गेला. मात्र एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात करदात्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. मे महिन्यात करवसुलीचा आकडा २८.३१ कोटींवर घसरला. त्यानंतर जूनमध्ये पाच टक्के सवलत दिली गेली. या महिन्यात २०.९८ कोटी वसूल झाले. जुलै महिन्यात तीन टक्के सवलत दिली गेली. या महिन्यात १३.२२ कोटींची वसुली झाली. करसवलत योजनेतून महापालिकेला भरीव करवसुली अपेक्षित होती. परंतु गतवर्षीच्या तुलनेत यंदा या योजनेला कमी प्रतिसाद मिळाला. एप्रिल ते जुलै २०२४ या कालावधीत महापालिकेला करसवलत योजनेच्या माध्यमातून ११४.६१ कोटींचा महसूल मिळाला होता. या वर्षी एप्रिल ते जुलै २०२५ या कालावधीत महापालिकेला १११.९२ कोटींचा महसूल मिळाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत घरपट्टी वसुलीत २.६९ कोटींची घट झाली आहे.
शहरातील सुमारे पावणेसहा लाख मिळकतधारकांपैकी २ लाख ३६ हजार ७१३ मिळकतधारकांनी या करसवलत योजनेचा लाभ घेतला. यामध्ये एप्रिल महिन्यात सर्वाधिक १ लाख १२ हजार ३०७, मेमध्ये ६० हजार ९०२, जूनमध्ये ३९ हजार ९९७, तर जुलै महिन्यात २३ हजार ५०७ मिळकतधारकांनी योजनेचा लाभ घेत घरपट्टी भरली.
या योजनेंतर्गत सोलर युनिट असलेल्या मिळकतधारकांना घरपट्टीत १ टक्का सवलत दिली गेली. यात एप्रिलमध्ये ११ लाख ४६ हजार ३९२ रुपये, मेमध्ये ४ लाख २२ हजार ४८७ रुपये, जूनमध्ये २ लाख ११ हजार ७५४ रुपये, तर जुलैत १ लाख ११ हजार ६५२ रुपयांची सोलर रिबेट अर्थात सूट दिली गेली.