

प्राप्तिकर भरणारे नोकरदार मंडळी 'अटल पेन्शन योजने'ला पात्र होते. पण, 1 ऑक्टोबर 2022 पासून करदात्यांना या योजनेपासून बाहेर ठेवण्यात आले आहे. म्हणजेच प्राप्तिकर भरणार्या नोकरदारांना अटल पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नाही.
काही खासगी कंपन्या कर्मचार्यांना पेन्शनचा लाभ देत नाहीत. वेतनातून पेन्शनपोटी कोणतीही रक्कम कपात केली जात नाही. त्याचवेळी अनेक सरकारी नोकरीतदेखील पेन्शनची सुविधा बंद झाली आहे. अशा वेळी संबंधित कंपनीत संस्थेत काम करणार्या कर्मचार्यांना भविष्यासाठी नोकरीच्या काळातच वेगळी तरतूद करावी लागते. याशिवाय केंद्र सरकारची 'अटल पेन्शन योजना'देखील चांगला पर्याय आहे. वास्तविक, 'अटल पेन्शन योजना' ही बरीच जुनी आहे; मात्र 1 ऑक्टोबरपासून या योजनेत झालेले बदल त्याला अधिक आकर्षक करणारे आहेत.
करदाते गुंतवणूक करू शकणार नाहीत
प्राप्तिकर भरणारी नोकरदार मंडळी अटल पेन्शन योजनेला पात्र होते. पण, 1 ऑक्टोबर 2022 पासून करदात्यांना या योजनेपासून बाहेर ठेवण्यात आले आहे. म्हणजेच प्राप्तिकर भरणार्या नोकरदारांना अटल पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नाही. अर्थात, पूर्वीपासून 'अटल पेन्शन'चा लाभ घेणार्या करदात्यांना मात्र ही योजना लागू राहणार आहे. केवळ नवीन करदात्यांना या योजनेपासून वंचित ठेवले आहे.
योजनेचे नियम काय?
या योजनेंतर्गत गुंतवणूक करणार्या व्यक्तीला 60 वर्षांच्या वयानंतर पेन्शनची तरतूद करण्यात आली आहे. पेन्शनची रक्कम ही एक ते पाच हजार रुपयांपर्यंत असू शकते. पेन्शनची रक्कम ही गुंतवणुकीचा कालावधी आणि रकमेवर अवलंबून आहे.
योजना कशी घेता येईल?
'अटल पेन्शन योजना' ही कोणत्याही सरकारी बँक किंवा पोस्टातून घेता येते. या योजनेसाठी लाभार्थ्यांचे वय 18 ते 40 वयोगटातील असणे गरजेचे आहे. 'अटल पेन्शन योजना' खाते सुरू करण्यासाठी बँकेच्या संकेतस्थळावर जावे किंवा नागरी सुविधा केंद्रावर उपलब्ध असणारा अर्ज भरावा. त्यासोबत आयडी प्रुफ आणि रहिवासी पत्ता म्हणून आधार, पॅन, व्होटर आयडी कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना किंवा रेशन कार्डच्या स्कॅन प्रती जोडाव्या लागतील. हा अर्ज प्रादेशिक भाषेत देखील उपलब्ध आहे. एखाद्याला इंग्रजी किंवा हिंदी येत नसेल, तर तो प्रादेशिक भाषेतून अर्ज भरू शकतो. लक्षात ठेवा, अर्ज भरताना मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे. कारण अर्ज दिल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबरवर कन्फर्मेशन मेसेज येतो.
किती मिळेल पेन्शन?
एखाद्या व्यक्तीचे वय 18 वर्षे आहे आणि दरमहा 42 रुपये गुंतवणूक करत असाल, तर त्याला 60 वर्षांनंतर 1000 रुपयाची मासिक पेन्शन मिळेल. याप्रमाणे 82 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवर 2000 रुपये, तर 126 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवर 3000 रुपये, 168 रुपयांच्या गुंतवणुकीवर 4000 रुपये, तर 210 रुपयांच्या मासिक पेन्शनवर 5 हजार रुपये मिळतील. व्यक्तीचे वय अधिक असेल, तर त्याची मासिक गुंतवणुकीची रक्कम देखील अधिक असेल. एखादा व्यक्ती वयाच्या 40 व्या वर्षी 'अटल पेन्शन'मध्ये रक्कम गुंतवू इच्छित असेल आणि त्याला हजार रुपये निवृत्तीवेतन हवे असेल, तर त्याला दरमहा 291 रुपये जमा करावे लागतील. पाच हजारांची पेन्शन हवी असेल, तर त्याला दरमहा 1454 रुपये जमा करावे लागतील. बँकेच्या संकेतस्थळावर प्रत्येक वयोगटातील गुंतवणुकीची रक्कम दिलेली आहे. यानुसार कोणतीही व्यक्ती संकेतस्थळावर जाऊन त्याची माहिती मिळवू शकतो.
नॉमिनीची सुविधा
'अटल पेन्शन योजने'च्या खातेधारकाचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या नॉमिनीला पेन्शनची सुविधा मिळते. उदा. पतीने गुंतवणूक केली असेल आणि त्याचा मृत्यू झाला असेल तर पत्नीला पेन्शनची सुविधा मिळते. याशिवाय पती आणि पत्नी दोघेही नसतील, तर मुलांना पेन्शनची सुविधा मिळते.
बचत खाते आवश्यक
या योजनेचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदारला बचत खाते असणे गरजेचे आहे. बँक खाते आधार आणि पॅन लिंक्ड असणे आवश्यक आहे. या योजनेनुसार एक व्यक्ती केवळ एकच खाते सुरू करू शकतो. वेगवेगळ्या बँकेत खाते सुरू करून 'अटल पेन्शन योजने'चा लाभ घेता येणार नाही. एवढेच नाही, तर नॉमिनीचेदेखील खाते सुरू केल्यास उत्तम राहील. कारण नॉमिनीच्या बँक खात्याचा क्रमांकदेखील अर्ज भरताना द्यावा लागतो.
राधिका बिवलकर