जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील कुसुंबा गावात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मालमत्ता आणि शेतीच्या वादातून एका वडिलांनी स्वतःच्या 32 वर्षीय मुलाचा निर्घृण खून केल्याचं उघडकीस आलं आहे. ही घटना 17 नोव्हेंबरच्या रात्री साधारणपणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. मयत तरुणाचे नाव सचिन रवींद्र पाटील (वय 32) असे असून पोलिसांनी त्याचे वडील रवींद्र भगवान पाटील यांना या हत्येप्रकरणी अटक केली आहे.
कुसुंबा गावातील पाटील कुटुंबामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सतत वाद सुरू होते. घरातील शेती, मालमत्ता यांच्यावरून मयत सचिन आणि त्याचे वडील रवींद्र पाटील यांच्यात नेहमीच भांडणं होत असत. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार, सचिनला दारूचे व्यसन होते आणि तो नशेत घरी आल्यानंतर घरात नेहमी बाचाबाची करत असे. त्यामुळे वडील त्याला मालमत्तेचा हिस्सा देण्यास तयार नव्हते.
गेल्या तीन महिन्यांपासून सचिन गावीच राहात होता. दरम्यान 17 नोव्हेंबरच्या रात्री तो नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला. वडील आणि मुलामध्ये पुन्हा एकदा मालमत्तेवरून वाद पेटला. वादाचं रूपांतर बाचाबाचीमध्ये झालं आणि स्थिती हाताबाहेर गेली. पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, रागाच्या भरात वडिलांनी सचिनला खाली पाडलं. घरात असलेल्या दोरीने त्याचे हातपाय बांधण्यात आले.
यानंतर रवींद्र पाटील यांनी घरातील लाकडी मोगरी उचलली आणि सचिनच्या डोक्यावर प्रचंड जोरात वार केले. वार इतका जबरदस्त होता की सचिनचा जागच्या जागी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. काही वेळातच त्याच्या हालचाली थांबल्या आणि तो बेशुद्ध पडला. रातभर कोणतीही हालचाल न झाल्याने परिस्थिती गंभीर झाली.
दुसऱ्या दिवशी, म्हणजे 18 नोव्हेंबरला सकाळी सातच्या सुमारास आरोपी वडील रवींद्र पाटील यांनी स्वतःच गावाचे पोलीस पाटील रईस जाफर तडवी यांना फोन करून सर्व प्रकार सांगितला. पोलीस पाटील यांनी तत्काळ त्यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता सचिन रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेला दिसला. घरात जमिनीवर रक्त, जवळच पडलेली रक्ताने माखलेली मोगरी, तसेच दारूची बाटली व इतर साहित्य मिळून आलं.
कौटुंबिक परिस्थितीही अत्यंत गुंतागुंतीची असल्याचं पोलिसांना दिलेल्या माहितीतून समोर आलं. रवींद्र पाटील यांच्या पहिल्या पत्नीचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला असून तिच्यापासून सचिन आणि पूजा अशी दोन अपत्ये आहेत. दुसऱ्या पत्नीपासून अभिषेक नावाचा मुलगा असून तो लहानपणापासून सुरत येथे मामाकडे राहत आहे.
या धक्कादायक घटनेनंतर रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे. मालमत्तेच्या वादातून बापानेच मुलाचा जीव घेतल्याची घटना गावात हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण आहे.