

सिडको : प्लॉट आणि जमीन मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल ४४ लाखांची फसवणूक करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलीस दलातील एका कर्मचाऱ्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित पोलीस कर्मचारी राम काशिनाथ वाघ याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर भालेराव पाटील (रा. कामटवाडे ) आणि संशयित राम काशिनाथ वाघ (वय, ३९ रा. गंगापूररोड नाशिक) हे दोघेही परस्परांचे परिचित होते. वाघ यांनी पाटील यांना मुंबई नाका परिसरात प्लॉट घेऊन देतो तसेच शिर्डीत जमीन मिळवून देतो, असे सांगत विश्वास संपादन केला आणि वेळोवेळी त्यांच्याकडून एकूण ४४ लाख रुपये घेतले.
मात्र, घेतलेल्या राशीच्या बदल्यात कोणताही प्लॉट किंवा जमीन न देता, पैसेही परत न केल्याने पाटील यांच्यावर आर्थिक व मानसिक ताण वाढला. अखेर या त्रासाला कंटाळून ११ ऑगस्ट रोजी त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेनंतर त्यांच्या पत्नी अर्चना मनोहर पाटील यांनी संशयित पोलीस कर्मचारी राम काशिनाथ वाघ यांच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार अंबड पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि फसवणूक यांसह संबंधित गुन्हे दाखल करून वाघ याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास अंबड. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेन्द्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन खैरनार करीत आहेत.