Great White Pelican 
नाशिक

Bird Sanctuary | नाशिकच्या 'भरतपूर'मध्ये राजबिंडा पाहुणा! नांदूरमध्यमेश्वरला 'रोझी पेलिकन'चे अनेक वर्षांनंतर दर्शन

Bird Sanctuary | अनेक वर्षांनंतर दुर्मीळ पक्ष्याचे दर्शन; परतीच्या प्रवासात 'महाराष्ट्राच्या भरतपूर'मध्ये विसावा

पुढारी वृत्तसेवा

निफाड : पुढारी वृत्तसेवा

नांद्रमध्यमेश्वर अभयारण्यात अत्यंत दुर्मीळ आणि राजबिंड्या पाहुण्याचे दर्शन बडले. आपल्या परतीच्या प्रवासात असलेल्या 'ग्रेट व्हाइट पेलिकन' म्हणजेच 'रोझी पेलिकन' या पक्ष्याने शनिवारी (दि. २८) हजेरी लावल्याने पक्षी अभ्यासक आणि निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अनेक वर्षांनंतर या देखण्या पक्ष्याने या रामसर स्थळाची निवड केल्याने हा परिसंस्थेसाठी शुभसंकेत मानला जात आहे.

हे पक्षी मूळचे युरोप आणि मध्य आशियातील आहेत. हिवाळ्याच्या सुरुवातीला ते दक्षिणेकडे स्थलांतर करतात. आता मार्च संपताना उन्हाची चाहूल लागताच ते पुन्हा उत्तरेकडे आपल्या मूळ स्थानी निघाले आहेत. या प्रवासात अन्नाचा साठा आणि विश्रांतीसाठी त्यांनी नांद्रमध्यमेश्वरची निवड केली आहे.

या पक्ष्यांच्या पांढऱ्याशुभ्र पिसांवर विणीच्या हंगामात किंवा विशिष्ट प्रकाशात नाजूक गुलाबी छटा उमटते, म्हणूनच त्यांना 'रोझी पेलिकन' असे संबोधले जाते. वनविभागाने गेल्या काही काळापासून जलाशयातील पाणवेली आणि टायफा यांसारख्या अनावश्यक गवताचे उच्चाटन करून योग्य अधिवास निर्माण केला आहे, परिणामी, माशांची मुबलक उपलब्धता झाल्याने हे दुर्मीळ पक्षी येथे आकर्षित झाले आहेत. जगातील सर्वात मोठ्या उडणाऱ्या पक्ष्यांपैकी एक असलेल्या पेलिकनचा पंखांचा विस्तार थक्ककरणारा असतो.

अभयारण्याच्या वैभवात भर

महाराष्ट्रात या पक्ष्याचे दर्शन अत्यंत दुर्मीळ मानले जाते. या पक्ष्यांच्या आगमनामुळे अभयारण्याच्या वैभवात अधिक भर पडली आहे. या राजबिंड्या पक्ष्याला कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पर्यटकांची पावले आता नांद्रमध्यमेश्वरकडे वळू लागली आहेत

नांद्रमध्यमेश्वर अभयारण्यासाठी ही ऐतिहासिक घटना आहे. 'ग्रेट व्हाइट पेलिकन' या पाहण्यांचे आम्ही मनापासून स्वागत केले आहे.
- हिरालाल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी, नांदूरमध्यमेश्वर
दुर्मीळ पक्ष्यांचे आगमन दर्शवते की, जर आपण अधिवास जपला आणि योग्य व्यवस्थापन केले, तर निसर्ग आपल्याला नक्कीच अशी अनोखी भेट देतो.
- हेमंत उबाळे, सहायक वनसंरक्षक, नांदूरमध्यमेश्वर
जलाशयातील माशांची उपलब्धता आणि योग्य अधिवास निर्मिती हेच या पक्ष्यांच्या आगमनाचे मुख्य कारण आहे. हे या परिसंस्थेच्या आरोग्याचे लक्षण आहे.
- कृष्णा भवर, उपवनसंरक्षक, वन्यजीव नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT