नाशिक : पत्रकार परिषदेत माहिती देताना कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह 
नाशिक

Nashik Ramteerth works -रामतीर्थाची कामे 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करणार : आयुक्त शेखर सिंह

द्वारका जंक्शनचे कामही मुदतीत; पुणे सर्व्हिस रोड १३.५ मी. रुंद होणार

पुढारी वृत्तसेवा

चार मुद्द्यांवर भर

भाविकांची सुरक्षितता

वाहतूक नियंत्रण

गर्दीचे नियोजन

नागरिकांना कमीत कमी त्रास

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या विविध कामांना वेग देण्यात आला असून, रामतीर्थ परिसरातील कामे १५ ऑक्टोबरपर्यंत, तर उर्वरित कामे डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शहरात सुमारे ३५० कामे सुरू असून, कायमस्वरूपी पायाभूत सुविधांची कामे संबंधित विभागांकडून, तर तात्पुरत्या सुविधा व भाविकांच्या सोयीची कामे कुंभमेळा प्राधिकरणाकडून केली जात आहेत, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

सिंहस्थ काळात लाखो भाविक नाशिकमध्ये दाखल होणार असल्याने दिशादर्शक व संकेतफलक, सुशोभीकरण, वाहनतळ, वाहतूक व्यवस्थापन आणि इतर आवश्यक सुविधा उभारण्यावर प्राधिकरणाचा भर आहे. कायमस्वरूपी मोठ्या पायाभूत सुविधांची जबाबदारी संबंधित विभागांवर सोपविण्यात आली आहे. दरम्यान, द्वारका जंक्शनवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुरू असलेल्या कामालाही वेग देण्यात आला आहे.

मुंबई-धुळे दिशेचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून, उड्डाणपुलाखालील उर्वरित स्लॅबचे काम १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून रस्ता खुला करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाला देण्यात आले आहेत. पुण्याच्या दिशेने जाणारा सर्व्हिस रोड पूर्ण १३.५ मीटर रुंदीने विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गाची वाहतूक क्षमता वाढून जंक्शनवरील कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ

द्वारका जंक्शनवरील कामांची पाहणी ३१ ऑगस्ट रोजी आ. प्रा. देवयानी फरांदे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत करण्यात आली. काम सुरू असताना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ व वाहतूक वॉर्डन उपलब्ध करून देण्यास कुंभमेळा प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सर्व कामांमध्ये संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून वेळेत कामे पूर्ण करावीत, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे सिंह यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT