नाशिक : 2012 साली जेव्हा महापालिकेत मनसेची सत्ता होती, तेव्हा विविध विकासकामे केली गेली. 2017 साली फडणवीस आले. म्हणाले, नाशिक मी दत्तक घेतो, त्यांच्या या घोषणेवर नाशिककर भुलले आणि आम्ही केलेली कामे विसरले. मात्र, दत्तक घेतो म्हणाल्यानंतर हा बाप पुन्हा फिरकलाच नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली.
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित केलेल्या ठाकरे बंधुंच्या संयुक्त सभेत राज ठाकरे यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली. निवडणूक काळात भीती दाखवायची, माणसे विकत घ्यायची, दहशत पसरावयाची हा प्रकार भाजपने सुरू केला आहे. 1952 साली जनसंघ नावाने जन्माला आलेल्या भाजपला 2026 साली पोरं भाड्याने घ्यावी लागत आहेत. तुमच्या पक्षात लोक होते ना, मग तुम्हाला बाहेरून का लोक मागवायचे आहेत? तुमची माणसे उभी केली होती, मग दुसऱ्यांची कशाला कडेवर घेऊन नाचत आहात.
येणारे आनंदाने येत नाही. रात्री पैसे पोहोचवले जातात. हा एवढे दिवस काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपमान नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तपोवनातील वृक्षतोडीवरून मुख्यमंत्री फडणवीस आणि कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांचाही त्यांनी समाचार घेतला. तुमच्यापेक्षा लाकूडतोड्या बरा होता. सोन्या-चांदीच्या कुऱ्हाडीलाही लाकूडतोड्या भाळला नाही. यांना बिल्डरांसाठी झाडं छाटायची आहेत. स्वत:च्या पक्षातील कार्यकर्ते छाटली, आता बाहेरून झाडे मागवून ती पक्षात लावत आहेत.
मनसे सत्ता काळातील कामांची यादी वाचून दाखविताना राज ठाकरे म्हणाले, आमची सत्ता असतानाही कुंभमेळा झाला. उत्तम पार पडला. एकही झाड कापले नाही. याशिवाय नाशिकचा विकास करून दाखविला. मुकणे धरणातून थेट पाइपलाइन टाकून नाशिकच्या पाण्याचा प्रश्न 50-60 वर्षांसाठी मार्गी लावला. जीपीएस लावलेल्या घंटागाड्या सुरू केल्या. घनकचरा प्रकल्प सुरू केला. वाहतूक बेटांचे सुशोभीकरण केले. बोटॅनिकल गार्डन केले. मी रतन टाटांकडे जेव्हा हा प्रकल्प घेऊन गेलो, तेव्हा ते म्हणाले किती खर्च येईल. मी त्यांना पाच कोटी म्हणालो. प्रत्यक्षात प्रकल्प जेव्हा झाला तेव्हा रतन टाटांनी 15 कोटी खर्च केले होते. नाशिकला चिल्ड्रन पार्क, गोदापार्क, शस्त्र संग्रहालय यासारखे पार्क साकारले. रतन टाटांपासून ते अंबानीपर्यंत उद्योजक नाशिकमध्ये आणले. मात्र, मागील पाच वर्षांत पूर्ण वाट लावली असल्याची टीकाही राज यांनी केली.
महापालिका कर्जमुक्त केली ः मनसेची सत्ता असताना महापालिकेवर 700 कोटींचे कर्ज होते. पुढच्या पाच वर्षांत आम्ही नाशिक महापालिका कर्जमुक्त केली होती. पाच वर्र्षांत विरोधकांकडून एकही भ्रष्टाचाराचा आरोप केला गेला नाही. मी कंत्राटदारांची बैठक घेतली होती. तुमच्याकडे जर कुणी पैसे मागितले तर सांगा, पण जर रस्त्यावर खड्डे पडले तर खड्ड्यात उभा करून मारेन, असेही राज म्हणाले.
राज यांचाही शंभरचा नारा ः लाडकी बहीण योजनेवरून निशाणा साधताना राज ठाकरे म्हणाले, आमचे आई-बाप पंधराशे रुपयांसाठी विकले गेले, विकास झालाच नाही असे तुमच्या मुलांनी भविष्यात म्हणू नये. आमच्या पाठीशी उभे रहा, असे आवाहन करताना अनंत कान्हेरे मैदानावरील फलकावर असलेल्या ’टोटल’ शब्दाकडे बघत मला नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरे सेनेचे शंभर नगरसेवक हवेत, असा नाराही त्यांनी दिला.
कल्याण-डोंबविलीत 15 कोटींची ऑफर ः बिनविरोध निवडीवरूनही राज ठाकरे यांनी निशाणा साधला. कल्याण-डोंबवलीत एकाच कुंटुंबातील तिघांना 15 कोटींची ऑफर दिली असा खळबळजनक दावा केला. 15 कोटी येतात कुठुन?, तुम्ही महाराष्ट्राची काय परिस्थिती करून ठेवली, असा आरोपही सत्ताधाऱ्यांवर केला.
फडणवीसांच्या नुसत्याच घोषणा
नाशिक नियो मेट्रो प्रकल्प, लॉजिस्टिक पार्क, बाह्य रिंग रोड, इगतपुरी तालुक्यात आदिवासी क्रीडा प्रबोधिनी असे अनेक प्रकल्प फडणवीसांनी जाहीर केले. पण एकही काम त्यांनी केले नाही. भाजपने फक्त धर्माच्या आणि जातीच्या नावाखाली लोकांना भुलवले. 2017 साली आमची सत्ता गेली आणि भाजपची सत्ता आली. एवढे काम करूनही मला पराभव पाहायला लागला, अशी खंतही राज ठाकरे यांनी व्यक्त केली. त्यामुळे नाशिकचा विकास साधण्यासाठी आम्हाला साथ द्यावी, अशी सादही राज यांनी घातली.
गुजराती कंत्राटदार : संजय राऊत
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 50 हजार कोटी रुपयांची कामे केली जात आहेत, मात्र, कुंभाच्या निमित्ताने नाशिकमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. कारण ही कामे गुजरातमधील कंत्राटदारांना मिळत आहे. कंत्रादारांची यादी दिल्लीतून तयार करण्यात आली असून, त्यानुसार गिरीश महाजन या कामांचे वाटप करत असल्याचा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला. 2025 पर्यंत नाशिक स्मार्ट सिटी करणार होते; मात्र नाशिकची स्थिती पाटना आणि लखनौ पेक्षाही वाईट झाली आहे. फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकला सावत्र बापापेक्षाही वाईट वागणूक दिली त्यामुळे नाशिकमध्ये आज ड्रग्ज आणि अमली पदार्थ शाळांपर्यंत पोहोचवले जातात, असेही राऊत म्हणाले.