Uddhav Thackeray | नाशिकमध्ये मुंबई मॉडेल राबवणार : उद्धव ठाकरे

भाजपचे हिंदुत्व केवळ निवडणुकीपुरते असल्याची टीका
Nashik Mumbai Model Development
Uddhav Thackeraypudhari photo
Published on
Updated on

नाशिक : भाजपने पाठीत वार केला म्हणून मी काँग्रेस, राष्ट्रवादीशी युती केली. त्यावर मी हिंदुत्व सोडल्याचा आरोप झाला. आता अकोटमध्ये एमआयएमशी युती केली तेव्हा कुणाचे काय सुटले, अशी खास ठाकरे शैलीत जळजळीत टीका करताना भाजपचे हिंदुत्व केवळ निवडणुकीपुरते असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील जाहीर सभेत केला.

हिंदुत्वाचा खोटा बुरखा घालून लोकांना अंधभक्त करणाऱ्या भाजपच्या झुंडशाहीविरोधात आताच पेटून उठले नाही तर इंग्रजांपेक्षाही अधिक काळ पारतंत्र्यात जावे लागेल, असे नमूद करताना शिवसेनेच्या सत्ताकाळात मुंबईत जे शक्य झाले जे सामान्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणणारं ठरलं, तेच मुंबई मॉडेल नाशिकमध्ये राबवणार असल्याची ग्वाही ठाकरे यांनी नाशिककरांना दिली.

महापालिकेची ही निवडणूक कुठल्या एका पक्षाच्या अस्तित्वाची नसून नाशिकचे नागरिक आणि त्यांच्या भावी पिढीचे आयुष्य कसे असेल ते ठरवणारी असल्याचे ठामपणे सांगताना उत्तम शहर घडवायचे असेल तर शिवसेना (उबाठा) व मनसेच्या हाती सत्ता द्या, अशी भावनिक सादही ठाकरे यांनी नाशिककरांना घातली. महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना (उबाठा) व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उबाठा नेते खा. संजय राऊत उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत एकत्र मंचावर उभे असल्याचा उल्लेख करत समाधान व्यक्त केले.

Nashik Mumbai Model Development
‌Paid Leave for Voting : ‘मतदानासाठी भरपगारी सवलत द्यावी‌’

‌‘आज मला खूप आनंद होतोय कारण माझ्यासोबत माझा भाऊ राज ठाकरे आहे. मनसेने नाशिकमध्ये केलेले काम आणि शिवसेनेने मुंबईत केलेले काम सर्वांनी पाहिले आहे. आता दोन्ही भाऊ एकत्र आले तर नाशिकचा किती उत्कर्ष होईल, याचा विचार करा, असे म्हणत त्यांनी शिवसेना-मनसे एकत्र येण्यावर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ‌‘आमच्या अस्तित्वाची चिंता कोणी करू नये. शिवसेनेने अनेक पराभव पाहिले, संघर्ष सहन केले; पण ती कधीच संपली नाही‌’, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

नाशिकसह महाराष्ट्रातील सर्वच शहरांमध्ये समस्या सारख्याच असल्याचे सांगत केंद्र व राज्यातील महायुती सरकारवर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, पाणीटंचाई, कचऱ्याचा प्रश्न, बेरोजगारी, वाढती गुंडगिरी, अमली पदार्थांची तस्करी, शिक्षणाचा अभाव आणि रस्त्यांवरील खड्डे. शहराचं नाव बदला, समस्या तशाच राहतात. ‌‘2014 पासून सत्तेत असलेल्यांनी या प्रश्नांवर केवळ आश्वासनं दिली, पण प्रत्यक्षात नागरिकांच्या जीवनमानात अपेक्षित बदल झाला नाही,‌’ अशी टीका त्यांनी केली.

मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या कामगिरीचा दाखला देताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज मुंबईत महापालिका शाळांमध्ये प्रवेशासाठी रांगा लागतात. लोक अभिमानाने सांगतात की त्यांचा मुलगा महापालिका शाळेत शिकतो. आरोग्य सुविधा, वैद्यकीय महाविद्यालये, स्वस्त व सक्षम सार्वजनिक वाहतूक - हे सगळं आम्ही करून दाखवलं आहे. सत्ता दिली तर नाशिकमध्येही असंच विकासाचं मॉडेल राबवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ठाकरे जे बोलतात ते करतात... ः उबाठा-मनसेचा वचननामा यावेळी उध्दव ठाकरे, राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. हा केवळ वचननामा नव्हे तर ठाकरेंचा शब्द आहे. ही काही बोगस मोदी गॅरंटी नाही ठाकरे जे बोलतात ते करतात, असे उध्दव ठाकरे म्हणाले. ‌‘मशाल‌’ हृदयात पेटती ठेवा. आम्ही केवळ सत्तेसाठी नव्हे तर तुम्हाला, तुमच्या मुलांना चांगले भविष्य देण्यासाठी एकत्र आलो आहोत, अशी ग्वाही ठाकरे यांनी यावेळी दिली.

Nashik Mumbai Model Development
Nashik Municipal Election : अवघ्या दोन तासांत ठरणार महापालिकेचे नवे कारभारी

भाजपचे ‌‘निवडणुकीपुरतं हिंदुत्व‌’ ः भाजपच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, हे खरं हिंदुत्व नाही, हे निवडणुकीपुरतं हिंदुत्व आहे. प्रभू रामचंद्रांच्या नावावर लोकांना स्वप्नात गुंतवून ठेवलं जातं; पण जमिनीवरील प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यांनी तपोवनातील वृक्षतोडीचा उल्लेख करताना पर्यावरण, जंगलतोड आणि विकासाच्या नावाखाली होणाऱ्या प्रकल्पांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

निष्ठा अन्‌‍ गद्दार...

सभेच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी नाशिककरांना थेट आवाहन केले. ‌‘त्यांच्याकडे पैसा असेल, सत्ता असेल; पण आमच्याकडे विश्वास आणि निष्ठा आहे. गद्दार विकत घेता येतात, पण निष्ठावान कधीच विकत घेता येत नाहीत‌’, असे सांगत त्यांनी शिवसेना-मनसेची मजबूत सत्ता नाशिकमध्ये उभी करण्याचे आवाहन केले. ‌‘नाशिक आपल्या हातात ठेवा, इतकी ताकद उभी करा की उद्या कोणीही ‌‘दत्तक बाप‌’ इथे पाय ठेवायला घाबरेल,‌’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेताना त्यांनी भाषणाचा समारोप केला.

दिनकर पाटीलही लक्ष्य

एक दिवस अगोदर मनसेचा झेंडा घेऊन कार्यकर्त्यांच्या गर्दीत नाचणारे दुसऱ्या दिवशी स्वत:च्या स्वार्थासाठी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी घेतात, अशा शब्दांत दिनकर पाटील यांच्यावर शरसंधान साधताना भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीने बरबटलेल्या लोकांची लंगोट धुणं नशिबी आलेल्या निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांविषयी आपल्याला वाईट वाटते,असे ठाकरे यांनी नमूद केले. कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय बघून भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांना रडू कोसळल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

सुधाकर बडगुजर यांच्यावर टीकास्त्र

ज्यांना राजकारणात पोरं होत नाही, त्यांना आमची पोरं दत्तक घ्यावी लागतात. हे काय नाशिककरांना दत्तक घेणार?, असा खरमरीत सवाल ठाकरे यांनी केला. आधी सलीम कुत्तासोबत फोटो असल्याचा आरोप करणारे आता त्याच कुत्ता- बिल्लीला सोबत घेऊन नाचत आहेत, अशी सडकून टीका करत ठाकरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुधाकर बडगुजर यांच्यावर निशाणा साधला. भाजप उपटसुंभ्यांचा पक्ष बनल्याचे सांगत आम्ही मोठी केलेली फक्त माणसं सोडून गेली, निष्ठावान कार्यकर्ता अजूनही सोबत असल्याचे ठाकरे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news