Raj Thackeray Pudhari photo
नाशिक

Raj Thackeray on Nashik Kumbh Mela - कुंभमेळ्याच्या नावाखाली नाशिकची वाताहत : राज ठाकरे

कमिशनखोरीचा बाजार मांडल्याचा सरकारवर आरोप

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली नाशिक शहराची वाताहत सुरू आहे. विकासकामांपेक्षा कमिशनखोरीला प्राधान्य दिले जात असून, महाराष्ट्रातील कंत्राटदारांना डावलून गुजरातमधील कंत्राटदारांना कामे देण्यामागे कोणाचे हितसंबंध आहेत, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. महाराष्ट्रात कंत्राटदार जन्मलेच नाहीत का ? प्रत्येकाला फक्त आपल्या कमिशनशी देणे-घेणे आहे, असा घणाघात त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

दोनदिवसीय नाशिक दौऱ्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी सिंहस्थाच्या तयारीपासून शहरातील रस्त्यांची दुरवस्था, खड्यांमुळे होणारे अपघात, वृक्षतोड, स्मार्ट सिटी प्रकल्प, प्रशासनाची यावरून रा कार्यपद्धती, शिक्षणाचे व्यापारीकरण, नीट परीक्षा आणि कोचिंग क्लासेसपर्यंत विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारला लक्ष्य केले.

ते म्हणाले की, माझ्यासमोर नाशिकमध्ये २००३ आणि २०१५ असे दोन कुंभमेळे झाले. २०१५ च्या कुंभमेळ्यात कोणती कामे सुरू आहेत, याचा नागरिकांना त्रास झाला नाही. कामे पूर्ण झाल्यानंतर रस्ते आणि इतर विकासकामे दिसून आली. त्यावेळी कुंभमेळ्यातून पैसे काढणे किंवा अर्थकारण हा उद्देश नव्हता. त्यामुळे कुंभमेळा अत्यंत चांगल्या पद्धतीने झाला. आज परिस्थिती पूर्णपणे बदलल्याचे सांगत राज ठाकरे यांनी प्रशासनावर निशाणा साधला. संपूर्ण शहर खड्ड्यांनी व्यापले आहे. लोकांचे बळी गेले आहेत. मात्र, प्रशासन ढिम्म आहे. माणसे गेल्याचे शासनाला काहीही सोयरसुतक नाही. कामातून आपले आरोप त्यांनी केला.

नाशिकमध्ये यापूर्वी झालेल्या विकासकामांचा संदर्भ देत त्यांनी शहराच्या झालेल्या दुर्दशेबद्दल खंत व्यक्त केली. बॉटनिकल गार्डन, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने उभारलेले संग्राहलयाचा उल्लेख करत त्यांनी, दुसऱ्याने केले आहे म्हणून त्याची वाट लावायची का, स्मार्ट सिटीची घोषणा केली होती. तिचे काय झाले, कुठे गेली ती स्मार्ट सिटी असा प्रश्न उपस्थित केला. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असून, त्याविरोधात अनेक आंदोलने झाली आहेत. मात्र, प्रशासनावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही.

महाराष्ट्रात कंत्राटदार जन्मलेच नाही का ?

सिंहस्थाच्या कामांसाठी गुजरातमधून कंत्राटदार आणले जात असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार करत ठाकरे यांनी राज्य सरकारला प्रश्न केला. या कुंभमेळ्यासाठी अनेक कंत्राटदार गुजरातमधून आणले जात आहेत, असे समजले आहे. महाराष्ट्रात कंत्राटदार जन्मलेच नाहीत का? वरून आदेश येतील, त्याप्रमाणे कुंभमेळा करायचा, अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रातील सर्व गोष्टी अशाच पद्धतीने हाताळल्या जात असतील तर यांना लखलाभ असो, असा टोला त्यांनी लगावला

भाजपला निवडून दिले तर भोगा

वृक्षतोड, रस्त्यांची दुरवस्था आणि शहरातील विकासकामांवरून नाशिककरांच्या मतदानाच्या निर्णयावरही ठाकरे यांनी भाष्य केले. हे सगळे चालू असताना निवडणुकीत लोक त्याच पक्षाला निवडून देत असतील, तर त्याची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली पाहिजे. नाशिकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जात आहेत. त्यावर आंदोलने झाली. पण काहीच होत नाही. लोक भाजपला निवडून देणार असतील तर भोगा. अजून काय बोलू शकतो मी, असा टोला त्यांनी लगावला.

कंत्राट देताना जात, भाषा, धर्म पाहिला जात नाही, ठाकरेंच्या आरोपांना फडणवीस यांचे प्रत्युत्तर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी गुजरातमधील कंत्राटदारांना प्राधान्य दिल्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेला आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला आहे. कंत्राट देताना कोणाचीही जात, भाषा किंवा धर्म पाहिला जात नाही. काम पूर्ण करण्याची क्षमता आणि निविदेतील पात्रता यावरच कंत्राट दिले जाते, असे स्पष्ट करत त्यांनी कुंभमेळा कामांच्या प्रक्रियेवर राज ठाकरेंसह विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर दिले. राज ठाकरे यांनी कुंभमेळ्याच्या कामांमध्ये गुजरातमधील कंत्राटदारांना आणल्याचा आरोप करत सरकारवर टीका केली होती. 'महाराष्ट्रात कंत्राटदार नाहीत का? वरून आदेश येतील तसे कुंभमेळे करायचे का?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या आरोपांवर मुंबईत मुख्यमंत्री म्हणाले की, कंत्राट प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यात आली आहे. एखादी कंपनी कोणत्या राज्यातील आहे, यापेक्षा तिची काम पूर्ण करण्याची क्षमता, तांत्रिक पात्रता, अटी महत्त्वाच्या असतात. गुणवत्ता तपासण्यासाठी तीन स्तरांवर यंत्रणा उभारण्यात आली.

गुजरातचे कंत्राटदार असल्याचा दावा खोटा : महाजन

कुंभमेळा कामांसाठी गुजरातमधील कंत्राटदार आणल्याच्या आरोपावरून मंत्री गिरीश महाजन यांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. गुजरातचे कंत्राटदार आहेत, हा दावा चुकीचा आहे. नाशिकमधील कंत्राटदारांची यादी देतो, त्यातील एक तरी बाहेरील कंत्राटदार दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले. महाजन म्हणाले, राज ठाकरेंना नाशिकमधील सुरू असलेल्या कामांची माहिती घेण्याची गरज आहे. शहरात सुमारे दीड हजार कोटींची कामे सुरू आहेत. आऊटर रिंगरोड, घाट आणि इतर प्रकल्पांची संपूर्ण माहिती देऊ. त्यातील गुजरातचे कंत्राटदार कोण आहेत, हे त्यांनी दाखवावे. ऑनलाइन निविदा प्रक्रियेमध्ये देशातील कोणतीही पात्र कंपनी सहभागी होऊ शकते. त्यामुळे केवळ आरोप करण्यापेक्षा वस्तुस्थिती तपासावी, असा टोला महाजन यांनी लगावला. तुम्ही नाशिक एवढे सुंदर केले होते, तर मग महापालिका निवडणुकीत मनसेचा पराभव का झाला, असा सवाल उपस्थित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT