Rabid Dog Attack 
नाशिक

Rabid Dog Attack | पिसाळलेल्या कुत्र्याचा सोनांबे-कोनांबे परिसरात 11 तास धुडगूस; सहा जणांना चावा

Rabid Dog Attack | मेंढपाळाच्या कळपावरही हल्ला

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील सोनांबे व कोनांबे परिसरात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने तब्बल ११ तास धुमाकूळ घालत पाच-सहा नागरिकांसह पाच-सहा जनावरांना चावा घेतल्याची घटना सोमवारी (दि. ७) घडली. कुत्र्याने मेंढपाळांच्या कळपावरही हल्ला केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास सोनांबे येथे रवींद्र निवृत्ती पवार या तरुणावर कुत्र्याने हल्ला करून त्याला चावा घेतला. त्यानंतर स्वामिनारायण गुरुकुलमधील विद्यार्थिनी कस्तुरी ज्ञानेश्वर आव्हाड हिच्यावरही कुत्र्याने हल्ला केला.

विद्यार्थिनीला वाचवण्यासाठी धावलेल्या सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक पांडुरंग पवार यांनाही कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले. परिसरातून जाणाऱ्या एका वाटसरूवरही कुत्र्याने हल्ला केला. तसेच मेंढपाळांच्या कळपावर हल्ला करून पाच-सहा जनावरांना चावा घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

या घटनेमुळे पांढुर्ली घाट परिसरात सोडण्यात येणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मोठ्या शहरांतून पकडलेली मोकाट कुत्री पांढुर्ली घाट परिसरात आणून सोडली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

परिसरातील पोल्ट्री शेडमधून मिळणाऱ्या कोंबड्यांच्या खाद्यामुळे ही कुत्री मोठ्या संख्येने या भागात आश्रय घेत असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे आसपासच्या गावांतील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

घटनेची माहिती मिळताच स्वामिनारायण गुरुकुलच्या मुख्याध्यापिका नीता माळोदे, धनंजय पवार, हनुमंत बैरागी, संपत सिनारे आदींनी सिन्नर येथे धाव घेत तहसीलदार सुरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी अशोक भवारी आणि सिन्नर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना निवेदन दिले. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

सोशल मीडियातून नागरिकांना सतर्क केले

पिसाळलेला कुत्रा नागरिकांवर हल्ले करत असल्याची माहिती मिळताच सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक पांडुरंग पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनांबे-कोनांबे परिसरातील नागरिकांना सतर्क केले. त्यामुळे अनेक नागरिक सावध झाले आणि संभाव्य हल्ल्यापासून बचावाला. मात्र, दुपारी एक ते दीडच्या सुमारास याच परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने पांडुरंग पवार यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT