नाशिक

नाशिक मनपा नोकरभरतीसाठी प्रश्नपत्रिका अंतिम टप्प्यात 

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; महापालिकेतील आरोग्य, वैद्यकीय व अग्निशमन विभागातील ५८७ पदांच्या भरतीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. भरतीसाठी उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी भरतीप्रक्रिया राबविणाऱ्या टाटा कन्सल्टन्सी (टीसीएस)ने संवर्गनिहाय प्रश्नपत्रिका तयार केली असून, महापालिका प्रशासनाच्या अवलोकनानंतर संभाव्य त्रुटी दुरुस्ती करून प्रश्नपत्रिका अंतिम केली जाणार आहे.

महापालिकेसाठी १९९५ मध्ये विविध संवर्गातील ७०९२ पदांच्या आकृतिबंधाला मंजुरी देण्यात आली होती. त्यावेळी नाशिक महापालिका क वर्गात होती. लोकसंख्या वाढल्याने महापालिकेचीही क वर्गातून ब वर्गात पदोन्नती झाली. परंतु वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचारीसंख्या वाढण्याऐवजी कमी होत गेली. दरमहा सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीमुळे सद्यस्थितीत महापालिकेतील सुमारे तीन हजार पदे रिक्त आहेत. प्रशासनाने सुधारित आकृतिबंध तयार करण्याचे कामही हाती घेतले आहे. या दरम्यान, कोरोना काळात तातडीची बाब म्हणून वैद्यकीय, आरोग्य तसेच अग्निशमन विभागातील पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार अग्निशमन विभागातील ३४८, तर वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला. डॉक्टर संवर्गातील ८२, तर अन्य ३९ अशा एकूण १२१ पदे वगळता ५८७ पदांची भरती टीसीएसमार्फत केली जात आहे. त्यासाठी सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन, पेमेंट गेटवे तयार करण्याचे काम पूर्ण केले आले. इच्छुक उमेदवारांची संर्वगनिहाय लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रश्नपत्रिका तयार करण्याचे कामही टीसीएसने हाती घेतले होते. यासाठी महापालिकेकडून विविध पदांशी निगडित परीक्षेचा अभ्यासक्रम मागून घेण्यात आला होता. त्याचा अभ्यास करून, प्रश्नपत्रिकेचे विविध नमुने तयार करण्यात आले असून, त्यातील एक प्रशासनाकडून अंतिम केला जाईल. टीसीएसकडून आलेल्या प्रश्नावलीच्या मसुद्यातील त्रुटी दुरुस्त करून त्यानंतर परीक्षा संदर्भामध्ये निर्णय घेतला जाईल.

डॉक्टर भरतीचा प्रश्न अनुत्तरितच

कोरोनाचे कारण देत महापालिकेतील या नोकरभरतीला शासनाने परवानगी दिली असली तरी यातील ८२ डॉक्टरांची भरतीप्रक्रिया राबविण्याचे टीसीएसला अधिकार नाहीत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून डॉक्टर पदांची भरती करावी लागणार आहे. यासाठी महापालिकेने शासनाकडून मार्गदर्शन मागविले होते. मात्र, शासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळू न शकल्याने डॉक्टर भरतीप्रक्रिया रखडली आहे.

असे असणार परीक्षा शुल्क

अर्जदारासाठी ४७५ ते ६७५ रुपये फी आकारली जाणार आहे. दहा हजारांपर्यंत परीक्षार्थी आल्यास एका उमेदवारासाठी ६७५ रुपये आर्थिक मोबदला कंपनीकडून आकारला जाणार आहे. दहा हजार ते पन्नास हजार मिळाले परीक्षार्थी आले तर एका उमेदवारासाठी सहाशे रुपये दर आकारला जाणार आहे. एक लाखापर्यंत परीक्षार्थी आल्यास प्रत्येक उमेदवार ५७५ रुपये, असा दर आकारला जाईल. दोन लाखांपर्यंत ५५० रुपये, पाच लाखांपर्यंत उमेदवार आल्यास ४७५ रुपये याप्रमाणे मोबदला द्यावा लागणार आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT