योगीराज यांनी बनविलेल्या रामलल्लांच्या मूर्तीची निवड | पुढारी

योगीराज यांनी बनविलेल्या रामलल्लांच्या मूर्तीची निवड

अयोध्या/नवी दिल्ली/म्हैसूर : अयोध्येच्या राम मंदिरात 22 जानेवारी रोजी नियोजित रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी तयार केलेल्या बालरूपातील (5 वर्षे वयाचे राम) मूर्तीची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी समाजमाध्यमांतून ही माहिती दिली.

कर्नाटक ही हनुमानाची भूमी आहे. जेथे राम आहे, तेथे हनुमान आहे. कर्नाटकची रामलल्लांसाठी ही एक विशेष सेवा आहे, असे यासंदर्भातील पोस्टमध्ये म्हटलेले आहे. येडियुराप्पा यांनी योगीराज यांचे अभिनंदन केले असून, कर्नाटक राज्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त केली आहे.

म्हैसूर येथील रहिवासी योगीराज यांनी सांगितले, मला ट्रस्टकडून सांगण्यात आले होते की, परमेश्वराचे दिव्य बालस्वरूप दिसू शकेल, अशी मूर्तीची रचना असावी. सहा-सात महिन्यांपूर्वी मी कामाला सुरुवात केली होती. अरुण योगीराज (वय 37) हे म्हैसूर राजघराण्याच्या शिल्पकार कुटुंबातील आहेत. याआधी तीन मूर्तींमधून मतदानाद्वारे एका मूर्तीची निवड करण्यात आल्याचे ट्रस्टकडून सांगण्यात आले. उर्वरित दोन्ही शिल्पकारांच्या मूर्तीही मंदिर आवारातच स्थापित होतील, असेही नमूद केले होते. योगीराज यांनी तयार केलेली मूर्ती श्यामल (हलकी निळी) रंगाची आहे. रामलल्ला गर्भगृहात कमळाच्या फुलावर विराजमान होणार आहेत. फुलासह मूर्तीची उंची सुमारे 8 फूट असेल. निव्वळ मूर्ती 51 इंचांची आहे.

राम मंदिर हे राष्ट्र मंदिर होणार : योगी

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौत मंगळवारी अधिकार्‍यांची एक बैठक घेतली. सुरक्षा, सोयीसुविधा आणि स्वच्छतेबाबत निर्देश दिले. राम मंदिर हे राष्ट्र मंदिर होणार असल्याने सर्वांनी 22 जानेवारीच्या कार्यक्रमाच्या तयारीला झोकून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शबरी भोजनालय, गुह निवास

माता शबरीच्या नावाने भोजनालय असेल, तर निषादराज (भिल्लराजे) गुह यांच्या नावाने निवास सुविधा असणार आहे.

मुस्लिम हे हिंदूंचे बंधूच म्हणून…

मुस्लिमांनी मशीद, दर्गा आणि मदरशांतून ‘श्री राम जय राम जय जय राम’ हा जप करावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंद्रेशकुमार यांनी केले. एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, देशातील सर्व मुस्लिम हे हिंदूंचे बंधूच आहेत. 99 टक्के मुसलमान आणि अन्य बिगर हिंदूंचेही भारताशी तेच नाते आहे, जे हिंदूंचे आहे. पुढेही हे नाते कायम राहील. कारण आपले सर्वांचे पूर्वज हे एकच आहेत.

22 जानेवारीला सुट्टी जाहीर करा

मुंबई : रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा सर्वांना पाहता यावा म्हणून 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे. सरकारी तसेच खासगी दोन्ही पातळ्यांवर ही सुट्टी असावी, असेही भातखळकर यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी याआधीच मुंबई महापालिका आयुक्तांना 22 जानेवारी रोजी महानगरातील सर्व मंदिरे तसेच सार्वजनिक इमारतींवर सजावट व रोषणाई करण्याचे आदेश दिले आहेत.

बौद्ध विहार; वाल्मिकी वसाहतीतून अक्षतावाटप

अयोध्येतील रामलल्ला नगरातील वाल्मिकी वसाहतीत अक्षता वाटपाने देशातील पाच लाख गावांना निमंत्रणे देण्याचा कार्यक्रम सुरू झाला. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय हे साधू-संतांसमवेत वाल्मिकी वसाहतीतील अनेक घरांत गेले. अक्षता, पत्रक व मंदिराचे चित्र देऊन सर्वांना प्राणप्रतिष्ठा समारंभानंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी निमंत्रित केले. दिल्लीत बौद्ध विहारापासून अक्षतावाटप मोहिमेची सुरुवात झाली.

Back to top button