नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात समविचारी पक्ष, दलित संघटना आणि संविधान प्रेमीतर्फे ४ फेब्रुवारीस निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. मंगळवारी (दि. २७) सायंकाळी हुतात्मा स्मारक येथे झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. पोलिस कवायत मैदानातील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख न केल्याने वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला होता.
मंत्री महाजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या महिलांचे व्हिडिओ समाज माध्यमांत व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची गंभीरता वाढली. मंत्री महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही त्यांच्याविषयी रोष व्यक्त केला जात आहे. मंगळवारी समविचारी राजकीय पक्ष, दलित संघटना, संविधानप्रेमींनी एकत्र येत हुतात्मा स्मारकात बैठक घेतली. मंत्री महाजन यांची कृती निषेधार्ह असल्याचा सूर व्यक्त करण्यात आला.
त्यांचा निषेध करण्यासाठी ४ फेब्रुवारीस सकाळी ११ वाजता नाशिकरोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सीबीएस येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय झाला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याबाबतचे स्पष्ट केले.
हा राज्यव्यापी मोर्चा असून इतर जिल्ह्यातील आंबेडकरप्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. डी. एल. कराड, राजू देसले, किरण मोहिते, अरुण काळे, दीपक डोके, पूनम सोनवणे, आकाश भालेराव, संजय भालेराव, चेतन गांगुर्डे, उत्तम जाधव, शशिकांत गवई, विनय कटारे यांनी केले.
बैठकीवर पोलिसांचा डोळा
समविचारी पक्ष तसेच दलित संघटनांनी अशा प्रकारची बैठक आयोजित केल्याचे समजताच पोलिसांचा मोठा फौजफाटा हुतात्मा स्मारकात गेला. काही पोलिस साध्या वेशात बैठकीत सहभागी झाले. बैठकीत कुठल्याही स्वरूपाचा व्हिडिओ अथवा फोटो काढू दिले गेले नसल्याचीही माहिती समोर येत आहे.