Nashik Central Jail Life  Pudhari
नाशिक

Nashik Jail Prisoner Facilities | शिक्षेतून फुलतात शिस्तबद्ध पुनर्वसनाचे अंकुर

Nashik Jail Prisoner Facilities | 50₹ कारागृहात प्रवेश केल्यानंतर कैद्यांचे जीवन पूर्णतः बदलते.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : निखिल रोकडे

50₹ कारागृहात प्रवेश केल्यानंतर कैद्यांचे जीवन पूर्णतः बदलते. समाजापासून वेगळे केले असले तरी त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित राहावे, यासाठी कारागृह प्रशासन मानवीय दृष्टिकोनातून काही मूलभूत सुविधा अटी व शर्तीच्या अधीन राहून उपलब्ध करून देते. कारागृहातील जीवन हे केवळ शिक्षा नसून शिस्तबद्ध पुनर्वसनाची प्रक्रिया आहे.

काम व मोबदला

ज्यांना शिक्षा सुनावलेली आहे, अशा दोष सिद्ध कैद्यांना कारागृहातील कारखान्यात काम करण्याची संधी दिली जाते. या कामाच्या बदल्यात त्यांना पगार स्वरूपात आर्थिक मोबदला दिला जातो. यामुळे कैद्यांमध्ये शिस्त, कौशल्यविकास आणि आत्मनिर्भरतेची भावना निर्माण होते.

प्रामुख्याने कैद्यांचे प्रकार

बंदी कैदी ज्यांची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. दोष सिद्ध कैदी ज्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावलेली आहे.

मेट व्यवस्था

न्यायालयीन प्रक्रिया सुरू असलेल्या बंदी कैद्यांना आठवड्यातून एकदा रक्तातील नातेवाइकांची भेट घेण्याची परवानगी असते. तर शिक्षा सुनावलेल्या कैद्यांना महिन्यातून एकदा भेट दिली जाते. या भेटीसाठी आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी, अपत्य अशा रक्ताच्या नात्यांनाच परवानगी असते.

पूर्वी भेटी प्रत्यक्ष स्वरूपात विशिष्ट अंतर राखून घेतल्या जात असत. मात्र बदलत्या काळानुसार आता पारदर्शक काचेच्या पलीकडून कारागृहातील दूरध्वनीद्वारे संवाद साधला जातो. त्यामुळे सुरक्षा अबाधित राहते आणि संवादही सुरळीत होतो.

स्मार्ट कार्ड सुविधा

बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करत कारागृह प्रशासनाने अधिकृत कंपनीमार्फत कैद्यांना स्मार्ट कार्ड सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या कार्डद्वारे बंदी कैदी आठवड्यातून तीन वेळा, प्रत्येकी सहा मिनिटे आपल्या कुटुंबीयांशी दूरध्वनीवर संवाद साधू शकतो.

संवादासाठी कुटुंबातील जास्तीत जास्त तीन सदस्य आणि एक वकील असे एकूण चार मोबाइल क्रमांक कारागृह प्रशासनाकडून पूर्वतपासणी करून मंजूर केले जातात. त्यानंतरच कॉल करण्याची परवानगी दिली जाते. पूर्वी नातेवाइकांना भेटीसाठी लांबचा प्रवास करावा लागत असे, वेळ आणि खर्च दोन्ही वाढत होते. स्मार्ट कार्ड सुविधेमुळे हा त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.

विशेष उपक्रम गळाभेट : वर्षातून एकदा सामाजिक दायित्व म्हणून बंदी कैद्यांसाठी गळाभेट उपक्रम राबविला जातो. या वेळी कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी दिली जाते. कॅन्टीन सेवा: कारागृहामध्ये कॅन्टीन सुविधा उपलब्ध आहे. ही सेवा कारागृह प्रशासनामार्फतच चालवली जाते. कैदी दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तू येथे खरेदी करू शकतात.

कॅन्टीनमध्ये उपलब्ध वस्तूः साबण फरसाण तेल बिस्किट

इतर आवश्यक किरकोळ वस्तू : कॅन्टीनची वेळ व महिन्यातील ठरावीक दिवस निश्चित केलेले असतात. तसेच रक्तातील नातेवाईक कैद्यांच्या दैनंदिन खर्चासाठी दरमहा कमाल आठ हजार रुपये मनीऑर्डरद्वारे पाठवू शकतात. ही प्रक्रिया कारागृह नियमांनुसार पार पडते. कारागृहातील या सुविधा केवळ नियमापुरत्या नसून पुनर्वसनाच्या प्रक्रियेचा भाग आहेत, शिक्षा भोगताना कैांचा मानसिक समतोल राखणे, कुटुंबाशी नाते जपणे आणि भविष्यात समाजात पुनर्स्थापना सुलभ करणे, हा या मागील मुख्य उद्देश आहे. कारागृह म्हणजे शेवट नसून नव्या आयुष्याची सुरुवात करण्याची संधी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT