नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकच्या गोदातीरी दि. ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाआरतीसाठी शृंगेरी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती स्वामीजी यांची भेट घेऊन रामतीर्थ गोदावरी सेवा समिती पदाधिकाऱ्यांनी रविवारी (दि. ४) आग्रहाचे निमंत्रण दिले. या विशेष महाआरतीला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही उपस्थिती राहणार आहे. या उपक्रमातून सामाजिक समरसता, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देशभर पोहोचविण्याचा समितीचा प्रयत्न आहे.
येत्या ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण कार्यक्रमानंतर सायंकाळी गोदातीरी होणाऱ्या या विशेष महाआरतीत तब्बल ६५०० जनजातीय बंधू-भगिनी सहभागी होणार आहेत. समाजातील विविध घटकांना एका व्यासपीठावर आणून, परस्परांमध्ये बंधुभाव आणि समरसतेची भावना दृढ करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
रामतीर्थ गोदावरी सेवा समिती पदाधिकाऱ्यांनी जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती स्वामीजी यांना महाआरतीमागील संकल्पना, सामाजिक उद्देश तसेच समाजाच्या विविध घटकांमध्ये समरसतेचा संदेश पोहोचविण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. समितीच्या कार्याची माहिती घेतल्यानंतर शंकराचार्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि शृंगेरी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती स्वामीजी यांची उपस्थिती लाभणाऱ्या या महाआरतीमुळे नाशिकच्या गोदातीरी सामाजिक समरसता, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचेल, अशी भावना समिती पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी रामतीर्थ गोदावरी सेवा समिती अध्यक्ष जयंत गायधनी, उपाध्यक्ष नरसिंह कृपादास, पंडित शांताराम भानोसे, शैलेश देवी, शिवाजी बोंडांडे, प्रफुल्ल संचेती, विनीत पिंगळे आदी उपस्थित होते.
शंकराचार्यांना स्मरणिका भेट:
शृंगेरी पीठाचा प्रमुख उद्देश धर्मरक्षण असून, त्याच भावनेने रामतीर्थ गोदावरी सेवा समिती विविध सेवा उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी नमूद केले. समितीने जगद्गुरू शंकराचार्याना गोदावरी आरतीची स्मरणिका भेट दिली. स्मरणिका पाहिल्यानंतर त्यांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले. दक्षिणाम्नाय शृंगेरी पीठाच्या कार्याचे प्रतिबिंब समितीच्या उपक्रमांमध्ये दिसत असल्याचे गौरव उद्गार त्यांनी काढले. तसेच रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या सर्व सेवा कार्याला शुभेच्छा देत आशीर्वाद आणि पाठिंबा व्यक्त केला.