Traffic Jam Pudhari
नाशिक

Nashik Traffic | नाशिकच्या खड्ड्यांत, वाहतूक कोंडीत अडकले ; विलंबाने अनेकांची एनडीए-सीडीएस परीक्षा हुकली

Nashik Traffic | १३ केंद्रांमध्ये परीक्षा ; ४,३७५ परीक्षार्थींपैकी अनेकांना प्रवेश नाकारला

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील खड्डेमय रस्ते आणि वाहतूक कोंडीचा फटका रविवारी (दि. १३) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी व नौदल प्रबोधिनी (एनडीए व एनए) तसेच संयुक्त संरक्षण सेवा (सीडीएस) परीक्षेला बसलेल्या काही उमेदवारांना बसला. परीक्षा केंद्रात वेळेत पोहोचण्यासाठी घरातून लवकर निघूनही रस्त्यातील वाहतूक कोंडीमुळे विलंब झाल्याचे सांगत काही परीक्षार्थी धावपळ करीत परीक्षा केंद्रामध्ये पोहोचले.

मात्र, प्रवेशद्वार बंद करण्याची निर्धारित वेळ उलटून गेल्यामुळे त्यांना केंद्रात प्रवेश मिळाला नाही. परिणामी तयारी करून आलेल्या अनेक उमेदवारांची परीक्षा हुकली. संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) वतीने शहरातील १३ उपकेंद्रांमध्ये एनडीए व एनए परीक्षा - २ २०२६ आणि सीडीएस परीक्षा - २ २०२६ घेण्यात आली.

दोन्ही परीक्षांसाठी एकूण ४,३७५ परीक्षार्थी प्रविष्ट झाले होते. परीक्षेच्या पहिल्याच सत्रात काही उमेदवारांना प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे केंद्राबाहेर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

यूपीएससीच्या नियमावलीनुसार परीक्षा सुरू होण्याच्या नियोजित वेळेच्या किमान ३० मिनिटे आधी परीक्षा केंद्राचे प्रवेशद्वार बंद केले जाते. दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले असून, यूपीएससीच्या नियमांनुसार प्रवेशद्वार बंद झाल्यानंतर उशिरा आलेल्या उमेदवारांना प्रवेश देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

रस्त्यात अडकलो, पण प्रवेश मिळाला नाही

काही परीक्षार्थींनी मात्र शहरातील वाहतूक व्यवस्था आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे वेळेत केंद्रामध्ये पोहोचणे शक्य झाले नसल्याचे सांगितले. परीक्षेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी शहराच्या विविध भागांतून केंद्रांकडे रवाना झाले होते. रविवारी सकाळच्या वेळेत काही मार्गांवर वाहतुकीचा वेग मंदावल्यामुळे उमेदवारांना विलंबाचा सामना करावा लागल्याचे त्यांचे म्हणणे होते. परीक्षा वर्षातून ठराविक वेळी होत असल्यामुळे एक - दोन मिनिटांच्या विलंबामुळे संपूर्ण संधी गमावण्याची वेळ आल्यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी होती.

कोंडीचा दावा प्रशासनाने फेटाळला

परीक्षा केंद्रांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात रस्ते खोदकाम अथवा दुरुस्तीचे काम सुरू नसल्यामुळे वाहतूक कोंडीमुळे विलंब झाल्याचे कारण वस्तुस्थितीला धरून नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. परीक्षा पूर्वनियोजित असल्यामुळे उमेदवारांनी निर्धारित वेळेपूर्वी केंद्रामध्ये उपस्थित राहणे, ही त्यांची जबाबदारी असल्याचेही प्रशासनाने नमूद केले.

त्याचप्रमाणे प्रवेशद्वार निर्धारित वेळेपूर्वी बंद करण्यात आल्याची कोणतीही तक्रार आलेली नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे प्रशासनाच्या दृष्टीने कारवाई नियमानुसारच झाली असली, तरी रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेचा फटका बसल्याची उमेदवारांची भूमिका कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT