नाशिक

Nashik Politics: भुजबळ X दराडे बंधू, कोकाटे X भाजप; नाशिकच्या राजकारणातील बाहुबली कोण ठरणार?

सह्याद्रीचा माथा ! रणधुमाळीत महायुतीचा बोलबाला

पुढारी वृत्तसेवा

Nashik politics Nagarpalika Nagar Panchayat Election 2025

डॉ. राहुल रनाळकर, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील 11 नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये सत्ता कुणाची असेल हे 3 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. या निवडणुकांच्या रणधुमाळीत सध्या महायुतीचा बोलबाला अधिक जाणवतो. काही ठिकाणी महायुतीतच सत्तेसाठी चुरस आहे आणि त्यामुळे महायुतीतीलच संघर्ष राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीची मोहीम सुस्त दिसत असल्याने दोन्ही आघाड्यांच्या रणनीतींमध्ये मोठी तफावत दिसून येते. 11 पैकी किती ठिकाणी महायुती झेंडा रोवेल आणि महाआघाडी किती ठिकाणी टक्कर देऊ शकते? या उत्सुकतेचा कळस सध्या दिसतो आहे.

राज्य नेतृत्वाने प्रतिष्ठेची केलेली निवडणूक

नगरपालिका, नगरपंचायतीत कोण ठरणार नाशिकचे बाहुबली…? या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या महायुतीच्या तिन्ही पक्षांनी ही निवडणूक पूर्ण प्रतिष्ठेची केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक दिग्गजांनी जिल्ह्यात सभा घेतल्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार भगूर आणि ओझर येथे सभा घेणार आहेत. मंत्री दादा भुसे आणि माणिकराव कोकाटे यांनीही आक्रमक भूमिका घेत आपल्या बालेकिल्ल्यांमध्ये मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीतील उट्टे काढण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी नेते आणि कार्यकर्त्यांकडून होताना दिसून येतो.

आमदारांमधील वर्चस्वयुद्धाची थेट टक्कर

या निवडणुकीचे खरे आकर्षण म्हणजे आमदारांतील प्रतिष्ठेची लढत. येवला येथे छगन भुजबळ विरुद्ध दराडे बंधू, नांदगाव-मनमाडमध्ये सुहास कांदे विरुद्ध राष्ट्रवादी, सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे विरुद्ध भाजप आणि शिंदेसेना, चांदवडमध्ये डॉ. राहुल आहेर यांची प्रतिष्ठा पणाला, पिंपळगाव बसवंतमध्ये दिलीप बनकर विरुद्ध भाजप-शिंदेसेना, इगतपुरीत हिरामण खोसकर यांना शिंदेची साथ आणि भाजपचा विरोध आणि सटाणा येथे दिलीप बोरसे यांच्यासमोर भाजपमध्ये बंडखोरी दिसून आली. या सगळ्याच ठिकाणी आमदारांच्या ताकदीची परीक्षा होणार आहे. या निवडणुकीचा निकाल पुढील विधानसभा समीकरणांवर थेट परिणाम करणारा ठरेल, हे स्पष्ट आहे.

भगूरमध्ये बदलेल्या निष्ठांचे विचित्र गणित

भगूरमध्ये थेट शिंदेसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना तयार झाला आहे. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे गटाने राष्ट्रवादीसाठी उमेदवार माघारी घेतल्याने येथे शिंदेसेनेविरुद्ध राष्ट्रवादी, भाजप आणि उबाठा हे एकाच बाजूला उभे ठाकले. शिंदेसेनेला धडा शिकवण्यासाठी विरोधी शक्ती एकत्र आल्याने भगूरचा सत्तासंग्राम राज्यभर चर्चेत आहे.

सिन्नरमध्ये महायुतीत लढत तापली

सिन्नरमध्ये महायुतीतील तिन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध मैदानात आहेत. भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी यांचे स्वतंत्र उमेदवार उतरल्यानं महाआघाडीला इथे काही प्रमाणात संधी निर्माण झाली आहे. परंतु मत विभाजनाचा परिपाक कोणाला लाभदायक ठरेल, हे मतदानाच्या टक्केवारीवर अवलंबून राहणार आहे.

भुजबळ विरुद्ध कांदे-दराडे यांच्यात झुंज

येवला, नांदगाव आणि मनमाड येथे शिंदेसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आमनेसामने आहेत. येवल्यात दराडे बंधूंनी उभे केलेले आव्हान छगन भुजबळांसाठी प्रतिष्ठेचे झालेले आहे. छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीत निवडणुकीची धुरा सांभाळत असलेले समीर भुजबळ किल्ला लढवत आहेत. त्यांची थेट लढाई आमदार दराडे बंधु यांच्याशी आहे. नांदगाव-मनमाडमध्ये सुहास कांदे पूर्ण ताकदीने भिडले आहेत. या तिन्ही ठिकाणांवर निकालांचा जिल्ह्यातील सत्ता समीकरणांवर मोठा परिणाम होणार आहे.

चांदवडमध्ये नवी खेळी ठरतेय लक्षवेधी

चांदवड येथे महायुती आणि महाविकास आघाडीचे पक्ष स्वतंत्र मैदानात आहेत. माजी आमदार कोतवाल भाजपात दाखल झाल्यानंतर ते पक्षाला कसे यश मिळवून देतात, हे महत्त्वाचे आहे. कोतवाल यांचा प्रवेश राहुल आहेर यांच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. विधानसभेतील कौटुंबिक धग या निमित्ताने क्षीण झाली आहे. चांदवडमधील नवा भिडू राहुल आहेरांच्या फायद्याचा तर पक्षातील वरिष्ठांसाठी काही प्रमाणात तापदायक ठरणारा आहे.

बागलाणमध्ये बंडखोरीने समीकरणे ढवळली

बागलाणमध्ये भाजपमधील बंडखोरीने संपूर्ण चित्र बदलले आहे. याचा फायदा शिंदेसेनेला किती मिळतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. शिवसेनेने येथे मोर्चेबांधणी जोरात केली असून बागलाणचा निकाल भविष्यातील राजकीय समीकरणांसाठी दिशादर्शक ठरणार आहे. आमदार दिलीप बोरसे या बंडखोरीला कितीप्रमाणात न्यूट्रल करू शकतात, हे पाहणेही गरजेचे आहे.

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर भाजपसाठी महत्त्वाचे

इगतपुरीत भाजपविरुद्ध शिंदेसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र लढाई उभारली आहे. तर त्र्यंबकेश्वरमध्ये महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिंदेसेना भाजपला रोखण्याच्या प्रयत्नात आहे. ही दोन्ही केंद्रे भाजपसाठी महत्त्वाची कसोटी ठरणार आहेत.

पिंपळगाव बसवंत : राष्ट्रवादीसाठी अनुकूल राहिल?

पिंपळगाव बसवंतमध्ये मनाविरुद्ध का होईना दिलीप बनकर आणि भास्कर बनकर एकत्र आल्याने राष्ट्रवादीसाठी लढाई सोपी दिसते. परंतु भाजपचे स्थानिक नेतृत्वही आक्रमक असून इथला निकाल अत्यंत चुरशीचा ठरणार आहे.

ओझर : कदम विरुद्ध कदम आणि भाजप

ओझरमध्ये महायुतीतील तिन्ही पक्ष स्वतंत्र लढत असले तरी खरी टक्कर माजी आमदार अनिल कदम आणि भाजप जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांच्यात आहे. दोन्ही भावांमधील हा सामना भाजपने प्रतिष्ठेचा केलेला असून इथला परिणाम जिल्ह्यातील संघटनात्मक घडामोडींवरही परिणाम करणारा ठरेल. मंत्री गिरीश महाजन यांनी ओझर प्रतिष्ठेचे केलेले दिसून येते.

निकालांवर ठरणार जिल्हा परिषद, पंचायत समितीची समीकरणे

ही निवडणूक केवळ स्थानिक सत्तेपुरती मर्यादित राहणार नाही. पुढील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विधानसभा निवडणुकीत कोण वरचढ ठरेल याचे पहिले संकेत हे निकाल देणार आहेत. आमदारांची ताकद वाढते की घटते, नेतृत्वावर सार्वजनिक विश्वास किती आहे, बंडखोरी किती प्रभावी होती, या सर्व प्रश्नांची उत्तरे 3 डिसेंबरनंतर मिळतील.

निकालावर राजकीय भवितव्य

एकूणच नाशिक जिल्ह्याचा राजकीय पट ठरवणारी ही निवडणूक ठरणार आहे. महायुतीचा आक्रमक रणनीती, महाविकास आघाडीचा सुस्त वेग आणि स्थानिक नेत्यांची वैयक्तिक प्रतिष्ठा या सर्वांचा संगम मतदारांनी दिलेल्या जनादेशातून उलगडणार आहे. नाशिकच्या राजकारणातील बाहुबली कोण ठरणार, याचा फैसला फक्त काही तासांवर येऊन ठेपला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT