

नाशिक : डॉ. राहुल रनाळकर
उद्धवसाहेब, सप्रेम नमस्कार.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाशिकबद्दल असलेलं प्रेम आजही जुन्या पिढीच्या काळजावर कोरलेलं आहे. बाळासाहेब स्वतः इथं यायचे, जनता दरबार भरायचे, प्रश्न ऐकून घेतले जायचे, आणि कधी रेटून, कधी समजावून, पण निर्णय घ्यायचे. तो काळ होता 'शिवसेनेचा बालेकिल्ला' म्हणून नाशिक नाव घेण्याचा! पण आज?
आज नाशिक नाव घेतलं की आठवतं ते फक्त... वाऱ्यावर उडू लागलेले भगवे झेंडे आणि चायना गेट चित्रपटासारखा राजकीय खेळ!
हो, चायना गेट! त्या चित्रपटात सगळे वयोवृद्ध सैनिक एका शेवटच्या लढ्यासाठी एकत्र आलेले दाखवले आहेत... आपल्याला वेळ मिळेल तेव्हा हा हिंदी सिनेमा जरूर बघा, या सिनेमातील वयोवृद्ध नायकांसारखी नाशिक शिवसेनेची अवस्था झाली आहे. एकेक बुरुज ढासळतोय, आणि कोणी त्याची गांभीर्यानं दखल घेत नाही. स्थानिक नेत्यांची अवस्था- 'जुनं नाव, पण विचारत नाही गाव!' अशी बनली आहे.
या परिस्थितीत अनेक जुने, निष्ठावंत चेहरे पक्ष सोडून गेले... पण त्यांना विचारायला कोणी फिरकलंदेखील नाही. ना संपर्कप्रमुख आले, ना कोणी फोन केला. त्यांना गमावण्याच्या वेदनेपेक्षा, सोडून गेले याची थोडीशी चीडही व्यक्त झालेली जाणवली नाही. फक्त समाजमाध्यमांवरून हकालपट्टी होताना दिसते. पण राजकीय संघटना समाजमाध्यमांद्वारे नाही चालत, हे आपल्याच ज्येष्ठ नेत्यांना आपण सांगाल का? भाजप तुमच्या पक्षाला फोडतोय, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना प्रबळ होत चालली आहे, बरेच कार्यकर्ते तिकडे वळत आहेत.
या सगळ्या घडामोडींकडे पाहताना आपण एका वाक्यात सांगता की, 'ज्यांना जायचं त्यांनी जावं.' पण उद्धवसाहेब, ही भूमिका सर्वथा चुकीची आहे. कार्यकर्ते हे पक्षाचं हृदय असतं. राजकीय स्पर्धेच्या या कठीण काळात एकेक माणूस टिकवणंसुद्धा अवघड झालंय. हे ओळखून भाजपमध्ये आधीच गर्दी असूनही त्यांची भरती थांबलेली नाही, मग तुमचं सैन्य सुकत असताना तुम्ही पुढे लढणार तरी कसं?
ज्यांना जपायचं होतं, त्यांना दुर्लक्षित केलं गेलं. पक्षाची लक्तरं टांगली जात आहेत, आणि आपण त्याकडे केवळ शांतपणे बघत आहात. मग हे कोण थांबवणार? नेतृत्वानं पुढाकार घ्यायला हवा. 'गेलं तर जाऊ द्या' या वृत्तीनं उरलेले शिवसैनिकही मग मार्गस्थ होतील, आणि शिवसेना फक्त स्मरणरंजनात उरेल, अशी भीती जुने-जाणते शिवसैनिक व्यक्त करताना दिसतात, तेव्हा वाईट वाटतं.
गंमत म्हणजे, जी नाशिक महानगरपालिका शिवसेनेच्या बळावर रंगलेली असायची, तिच्यावर आता विविध राजकीय पक्ष रंग उधळत दावा सांगताहेत. विकास इथं थांबलाय, नियोजन धूसर झालंय, अन् नाशिकच्या जनतेचा संयम संपत चाललाय. इथला विकास आता जो काही होईल, तो कुंभमेळ्याच्या निधीभोवती केंद्रित झालेला दिसतोय.
साहेब, तुम्ही 'विचारांची शिवसेना' म्हणता. पण नाशिकमध्ये सध्या ना विचार दिसतो, ना शिवसेना. शिल्लक राहताहेत त्या फक्त रिकाम्या खुर्च्या. आणि सत्तेच्या सोंगट्यांची खेळी. बालेकिल्ल्याचे दरवाजे उघडेच राहिले, आणि आत शिरताहेत संधिसाधू!
हे सगळं थांबवायचं असेल, तर पुन्हा एकदा 'नाशिकला जवळून ओळखणाऱ्या उद्धव'ची इथं प्रतीक्षा आहे. आपण रस्त्यावर उतरायला हवं, सामान्य शिवसैनिकाच्या खांद्यावर हात ठेवायला हवा. नाहीतर नाशिक स्मरणरंजन करत म्हणेल 'बाळासाहेब तर गेले, आणि पाठोपाठ बालेकिल्लाही!'
साहेब, खरं सांगायचं तर नाशिकचा कार्यकर्ता अजूनही तुमच्यावर प्रेम करतो, आदरानं पाहतो. पण तो गोंधळलेला आहे. एका बाजूला बाळासाहेबांची आठवण, दुसऱ्या बाजूला मनसे सोबत येईल का? ही अस्वस्थता अन् तिसऱ्या बाजूला भाजप-शिंदे शिवसेनेत कार्यकर्त्यांना ओढण्याची चढाओढ. या कोलाहलात तुमच्या शिवसेनेचा आवाज क्षीण होत चालला आहे.
शिवसेनेच्या इतिहासात नाशिक हा केवळ एक बालेकिल्ला नव्हता, तर ही एक प्रयोगशाळा होती. पक्षाचं नाशिक मॉडेल राज्यभर राबवलं जायचं. शिवसेना मात्र आता इथं हरवतेय. याची दुसरी आणि प्रखर बाजू म्हणजे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रावरचा प्रभाव गमावण्यासारखं आहे. साहेब, वेळ अजून गेलेली नाही... आता उठाव करायचा असेल, तर तो शब्दांमध्ये नव्हे, कृतीत दिसायला हवा. आपल्याच भाषेत सांगायचं झालं, तर 'वाघ हा जंगलात शोभतो, पिंजऱ्यात नाही!'
आदित्य जी, आपणही दोनेक वर्षांपूर्वी नाशिकमध्ये एका पुरातन वटवृक्षाला वाचवण्यासाठी आला होता. एका झाडासाठी तुमची धडपड, माध्यमातले कव्हरेज आणि लोकांमध्ये निर्माण झालेला आदर अजूनही नाशिककर विसरलेले नाहीत. पण आज इथं केवळ एक झाड नाही, तर संपूर्ण पक्षाची पाळेमुळे उखडून टाकली जात आहेत. आणि तरी तुम्हीदेखील कुठं दिसत नाहीत...! वटवृक्ष वाचवणारा नेता आज स्वतःच्या पक्षाचं वटवृक्षासारखं अस्तित्व का वाचवत नाही?
आदित्य जी, तुम्ही युवा नेता आहात. बुद्धिमान, संवेदनशील, आधुनिक या सगळ्या उपाध्या तुमच्या नावासोबत जोडल्या जातात. पण या सगळ्यांचा उपयोग तेव्हाच होतो, जेव्हा जनतेच्या जिवंत प्रश्नांशी तुम्ही भिडता. नाशिकमध्ये आज कार्यकर्ते गोंधळलेले आहेत, माघारी चालले आहेत, आणि तुम्ही इथे फिरकलाही नाहीत! सभा घेणं, फेसबुक-ट्विटरवर मुद्दे मांडणं हे महत्त्वाचं असतं, पण राजकारण ही केवळ 'इमेज मॅनेजमेंट' नसून 'ग्राउंड कनेक्टिव्हिटी'चीसुद्धा लढाई असते. नाशिकमध्ये पक्ष रसातळाला चाललाय, सेनापती दुसऱ्यांच्या गोटात जाताहेत... आणि तरीही शांतता?
बाळासाहेबांची शिवसेना तुमच्या खांद्यावर आहे, ही केवळ एक कौटुंबिक जबाबदारी नाही, ती लाखो कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानाची साखळी आहे. तुमचं नाशिककडं दुर्लक्ष हे शिवसेनेच्या उरलेल्या आशेवरचं संकट वाटतंय. तुम्हाला जर खरोखर पुढचं नेतृत्व घ्यायचं असेल, तर त्या पदासाठी रस्त्यावरची धूळ खावी लागते, प्रश्नांमध्ये घुसावं लागतं, आणि जनतेच्या डोळ्यांत डोळे घालून उत्तरं द्यावी लागतात.
आज नाशिकला पर्यावरण नव्हे, तर राजकीय प्राणवायू हवा आहे आणि तो प्राणवायू तुमच्यासारख्या नेत्यानं द्यायला हवा. कारण पुढच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या भावना नाही, तर फाटलेली संघटना तुमच्याशी लढेल. तेव्हा मात्र उशीर झालेला असेल.
जय महाराष्ट्र!