त्र्यंबकेश्वर ( नाशिक ) : पितृपक्ष हा साधारणपणे व्यापार-उद्योगातील थंडाव्याचा कालावधी मानला जातो. मात्र त्र्यंबकेश्वर नगरीसाठी हा काळ लक्ष्मीयोग घेऊन येतो. प्रतिपदा ते सर्वपित्री अमावस्या या पंधरवड्यात येथे रोज हजारो धार्मिक विधी पार पडतात आणि त्यामधून कोटींची उलाढाल होते.
त्र्यंबकेश्वर येथे नारायण नागबली, त्रिपिंडी श्राद्ध आणि कालसर्प शांतीसारखे विधी वर्षभर सुरू असतात. मात्र पितृदोष निवारणासाठी या पंधरा दिवसांत श्राद्ध विधींना विशेष महत्त्व असल्याने भाविकांची गर्दी उच्चांकी असते. अपघाती किंवा अकाली मृत्यू झालेल्यांचे क्रियाकर्म न झाल्यास, संतती प्राप्ती न होणे, विवाहात अडथळे अशा कारणांसाठी कुटुंब मोठ्या संख्येने येथे येतात.
नारायण नागबली हा तीन दिवसांचा विधी असल्याने भाविकांना मुक्काम करावा लागतो. त्रिपिंडी श्राद्ध, कालसर्प शांती यांसारखे विधी एक-दोन दिवसांत पार पडतात. एका कुटुंबात किमान तीन जणांसह, बहुधा मुलाबाळांसहित येतात. अशावेळी एकाच वेळेस अनेक विधी पूर्ण करून घेतले जातात. परिणामी निवास, भोजन, प्रवास, पूजा साहित्य आदी सेवांची मोठी मागणी निर्माण होते.
पूजा पहाटेपासून दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहतात. भाविकांना पांढरे वस्त्र परिधान करावे लागते. शौर म्हणून डोक्याचे केस काढणे, नारळ-सुपारी खरेदी करणे, सोन्याचा नाग ठेवणे अशी विविध तयारी लागते. या विधींसाठी दर्भ, पळसाची पाने, समीधा, शेणाच्या गोवऱ्या यांसारख्या साहित्याची मागणी वाढते. हे साहित्य तयार करणारे, वाहून नेणारे व पूजा मांडणारे पाटीवाले, कामगार यांनाही मजुरी मिळते.
निवासासाठी दोन हजार खोल्या
निवासाच्या सोयींसाठी त्र्यंबकेश्वरात सध्या सुमारे दोन हजार खोल्या उपलब्ध आहेत. त्याचे भाडे दिवसाला १,५०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आकारले जाते. काही भाविकांना खोली न मिळाल्यास ते थेट वाहनात किंवा डोंगराळ भागात मुक्काम करतात. नारायण नागबलीसाठी साधारण ७,५०० रुपये आकारले जातात तर त्रिपिंडी श्राद्धासाठी ३,००० रुपये घेतले जातात. यामध्ये मुक्काम व दोन वेळचे जेवण समाविष्ट असते. काही पुरोहित केवळ दक्षणा घेतात, तर मुक्काम-भोजनाची जबाबदारी भाविकांवर सोडतात.
दररोज पाच हजार विधी
सध्या त्र्यंबकेश्वरात दररोज सुमारे ५,००० धार्मिक विधी होत आहेत. त्यासाठी किमान १५,००० भाविक मुक्कामी आलेले असतात. भोजन, नाश्ता, प्रवास, निवास, पूजा साहित्य या सर्वांमधून रोज कोट्यवधींची उलाढाल होत आहे. धार्मिक पर्यटनाशी जोडलेले हे अर्थचक्र पितृपक्षात गतीमान होते आणि स्थानिकांना रोजगार व उत्पन्नाचा मोठा स्रोत ठरते.