

नाशिक: गणेश विसर्जनानंतर सुरू झालेल्या पितृपक्षामुळे बाजारात भाजीपाल्याच्या दरात उसळी पाहायला मिळत आहे. साध्या भाज्यांचा नैवेद्यासाठी उपयोग केला जात असल्याने गिलकं, दोडके, भोपळा आणि पालेभाज्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. परिणामी काही भाज्या तब्बल ३० टक्क्यांनी महागल्या असून १०० रुपयांपुढे गेल्या आहेत.
यंदा जुलैपासून जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतीमाल वेळेत काढता न आल्याने तो नासधूस झाला. त्यामुळे बाजारात आवक घटली आणि पितृपक्षामुळे मागणी वाढल्याने दर आटोक्यात राहिले नाहीत.
पितृपक्षात साध्या भाज्यांना धार्मिक महत्त्व आहे. गिलके आणि दोडके या भाज्यांचा विशेष समावेश असल्याने या दिवसांत त्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. एरवी ६० ते ७० रुपयांत मिळणाऱ्या या भाज्या सध्या ९० ते १४० रुपयांपर्यंत विकल्या जात आहेत.