Murder Case Pudhari
नाशिक

Sinnar Murder News | सिन्नर हादरला! पार्टीच्या बहाण्याने मित्राची हत्या; पास्ते घाटातील अनोळखी मृतदेह प्रकरणाचा छडा

Sinnar Murder News | दोन संशयित ताब्यात; पास्ते घाटातील खून प्रकरणाची 24 तासांत उकल

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

मोहदरी-पास्ते घाट परिसरात आढळलेल्या अनोळखी पुरुषाच्या खून प्रकरणाची एमआयडीसी व सिन्नर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उकल करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. अरुण बाळू पदमिरे (रा. उभाडे-घोटी, ता. इगतपुरी) व कोनांबे येथील एका विधिसंघर्षित बालकाच्या खुनात सहभाग निष्पन्न झाला.

सखोल चौकशीत त्यांनी पार्टी देण्याच्या बहाण्याने कमलेश कुमार याला पास्ते घाटातील डोंगर परिसरात नेऊन, वाद झाल्यानंतर धारदार चॉपरने पाठीवर व पायावर वार करून तसेच गळा दाबून त्याची हत्या केल्याची कबुली दिली. ३० डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोहदरी गावाच्या शिवारात, पास्ते घाट येथे रस्त्याच्या कडेला एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मृतदेहाच्या पाठीवर व पायावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या तसेच गळा आवळल्याच्या खुणा आढळून आल्याने खुनाचा संशय बळावला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भरत जाधव, सिन्नर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भांबरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

निफाड उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी कांतीलाल पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी के. के. पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी व सिन्नर पोलिस ठाण्यांची स्वतंत्र तपास पथके गठित करण्यात आली.

मृत व्यक्ती अनोळखी असल्याने प्रथम त्याची ओळख पटविण्यात आली. सखोल तपासानंतर मृताचे नाव कमलेश कुमार लीलाधर पटेल (वय ३०, मूळ रा. तिघरा गोटेगाव, पोस्ट सरा तिघरा, जि. नरसिंगपूर, मध्य प्रदेश) असे असल्याचे निष्पन्न झाले. तो सध्या माळेगाव एमआयडीसी येथे भाड्याच्या खोलीत राहून माळेगाव औद्योगिक वसाहतीत काम करत होता. सीसीटीव्ही फुटेजच्या तपासात ३० डिसेंबर रोजी कमलेश कुमार हा दोघांसह मोटारसायकलवर जाताना दिसून आला.

त्यानंतर संशयित आरोपींचा शोध घेण्यात आला. दोन्ही संशयित आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भरत जाधव करीत आहेत.

सापळा रचून आवळल्या मुसक्या

दरम्यान, पोलिस निरीक्षक भरत जाधव व हेमंतकुमार भांबरे यांना गोपनीय माहिती मिळाली की, गुन्ह्यातील आरोपी सिन्नरकडून कोनांबे गावाच्या दिशेने जाणार आहेत. त्या आधारे समृद्धी महामार्गावरील कोनांबे गावाजवळील पुलाजवळ सापळा रचण्यात आला. मोटारसायकलवरून येणाऱ्या दोन इसमांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT