नाशिक

MSRTC Bus Leaking |"एसटीतही छत्री उघडून प्रवास करण्याची वेळ!नाशिक-करंजुल बसमधील दयनीय अवस्थेवर प्रवाशांचा संताप"

MSRTC Bus Leaking | एसटीतून छत्रिने प्रवास ; प्रवाशांचा संताप

पुढारी वृत्तसेवा

बोरगाव : पुढारी वृत्तसेवा

सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागात धावणाऱ्या नाशिक-करंजुल एसटी बसची दुरावस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. पावसाळ्यात बसच्या छतामधून मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याने प्रवाशांना बसमध्येच छत्री धरून प्रवास करण्याची वेळ आली. या बसमधील धक्कादायक परिस्थिती समोर आल्याने एसटी महामंडळाच्या कारभाराबाबत प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

पावसाळा सुरू असतानाच या बसच्या छताला अनेक ठिकाणी गळती लागली असून, आसनांवर पाणी साचत आहे. त्यामुळे प्रवाशांचे कपडे, पुस्तके आणि अन्य साहित्य भिजते. पावसाच्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी काही प्रवाशांनी बसमध्येच छत्री उघडून प्रवास केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी, शेतकरी, महिला, कामगार आणि ज्येष्ठ नागरिक नाशिकसह परिसरातील गावांकडे प्रवास करतात. मात्र, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाऐवजी त्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. बसमध्ये उभे राहण्यासाठीही पुरेशी जागा नसल्याने प्रवाशांच्या गैरसोयीत भर पडत आहे.

आदिवासी भागासाठी सातत्याने जीर्ण आणि जुन्या बसेस उपलब्ध करून दिल्या जात असल्याची तक्रार अनेक वर्षांपासून होत आहे. अनेकदा या बसेस रस्त्यातच बंद पडतात, वेळेवर पोहोचत नाहीत आणि प्रवाशांचा वेळ व पैसा वाया जातो.

पावसाळ्यात गळक्या बसमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिक-करंजूलसह सुरगाणा तालुक्यातील सर्व मार्गांवर नवीन वा सुस्थितीतील बसेस उपलब्ध करून द्याव्यात, तसेच गळक्या व जीर्ण बसेसची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

"राज्य सरकार आणि प्रशासनाने तातडीने नवीन व सुस्थितीतील बसेस उपलब्ध करून द्याव्यात. आदिवासी भागातील जनतेलाही इतर भागांप्रमाणे सुरक्षित, सन्मानजनक आणि दर्जादार वाहतूक सुविधा मिळाल्या पाहिजेत."
गणेश एकनाथ महाले (हट्टी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT