नाशिक : ऑनलाइन पार्टटाइम जॉबच्या बहाण्याने पैसे कमावण्याचे आमिष दाखवून 36 लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फसवणूक झालेल्यांमध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.
याबाबत माहिती अशी की, फिर्यादी आणि साक्षीदार यांना विविध व्हॉट्सॲप क्रमांक आणि टेलिग्रामवरून चॅटिंग करणाऱ्या अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधला. या व्यक्तींनी ऑनलाइन पार्टटाइम जॉबच्या बहाण्याने पैसे कमावण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या बँक खात्यांवर 36 लाख 882 रुपये ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले.
फिर्यादी आणि त्याच्या साथीदारांनी आरोपींनी सांगितलेल्या पॅन खात्यावर ही रक्कम जमा केली. मात्र, रक्कम जमा करूनही जॉब मिळत नसल्याने आरोपींकडे विचारणा केली असता, त्यांनी पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे तपास करत आहेत. अलीकडच्या काळात ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. मात्र, याबाबत नागरिकांनीच काळजी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून आपली आर्थिक फसवणूक होणार नाही. सोशल मीडिया व इतर माध्यमांवर आलेल्या ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहावे, असे आवाहन सायबर पोलिस ठाण्याकडून करण्यात आले.