

ओझर : निफाड तालुक्यातील ओझर - खेरवाडी या वर्दळीच्या रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक व प्रवाशांचे हाल होत आहेत. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे.
गोल्डन आयटीआय, भडके वस्ती, होरायझन अकॅडमी, महादेव मंदिर परिसर ते खेरवाडी चांदोरी चौफुली या संपूर्ण मार्गावर डांबर उखडत मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने, शालेय विद्यार्थी, कामगार, शेतकरी व नागरिक प्रवास करतात. मात्र, सध्याच्या परिस्थितीत वाहन चालवणेही जीवघेणे ठरत आहे.
पावसाळ्यानंतर खड्ड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक ठिकाणी रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या बांधकाम विभागाकडून ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. अनेक वेळा तक्रारी करूनही केवळ आश्वासनांवरच बोळवण केली जात असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परिणामी रुग्णवाहिका, शालेय बस तसेच इतर सेवांनाही मोठा अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने दखल घेत रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने तत्काळ गंभीर दखल घेत कोणताही विलंब न करता रस्ता दुरुस्तीचे काम लवकर सुरू करावे.
राकेश जाधव, नगरसेवक
या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहन चालवणे तर सोडाच, सुरक्षित प्रवास करणेही कठीण झाले आहे. अपघाताचा धोका वाढला असून, नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी दुरुस्ती करावी.
राम वेताळ, प्रवासी