ठळक मुद्दे
22 ऑनस्ट्रीट व 6 ऑफस्ट्रीट अशा 28 रस्त्यांवर पार्कींग झोन विकसित केले जाणार
पार्कींग झोन निश्चितीनंतर नो पार्कींगमधील वाहनांवर टोईंगव्दारे कारवाई केली जाणार
नो पार्कींगमधील वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार
नाशिक : शहरातील वाहनतळांची समस्या सोडविण्यासाठी नाशिक पश्चिम विभागात प्रायोगिक तत्वावर सहा चौरस किलोमीटरमधील २२ ऑनस्ट्रीट व सहा ऑफस्ट्रीट अशा २८ रस्त्यांवर शंभर ते दीडशे मीटर अंतरावर नो पार्किंग व पार्किंगची स्थळे विकसित केल्यानंतर आता पंचवटी व नाशिकरोड या दोन विभागांमध्ये देखील पार्कींग झोन विकसित केले जाणार आहेत. यासाठी वाहतुक कक्षामार्फत कार्यवाही सुरू करण्यात आली असून पार्कींग झोन निश्चितीनंतर नो पार्कींगमधील वाहनांवर टोईंगव्दारे कारवाई केली जाणार आहे.
शहरातील वाहनतळांचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रामुख्याने शहरातील बाजारपेठ परिसरात वाहनतळांअभावी रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे पार्क केली जाणारी वाहने वाहतुक कोंडीचे कारण ठरत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने ट्रॅफिक सेलमार्फत शहरातील वाहतूक सर्वेक्षण केले. त्याव्दारे शहरात वाहनतळांच्या नवीन जागा विकसित करण्याची योजना पुढे आली. पहिल्या टप्प्यात नाशिक पश्चिम विभागात प्रायोगिक तत्वावर पार्कींग-नो पार्कींग झोन विकसित करण्याचा निर्णय घेतला गेला. त्याअंतर्गत या विभागातील 28 रस्त्यांवर ऑन आणि ऑफ स्ट्रीट वाहन तळे निश्चित करण्यात आली.
एका कारसाठी जेवढी जागा लागते ते मापक गृहीत धरून अठराशे वाहनांच्या पार्किंगसाठी सर्वाधिक वर्दळ असलेला पार्कींग झोन तयार केला गेला. पार्कींग झोनमध्ये पार्क केल्या जाणाऱ्या वाहनांकडून शुल्क आकारणी केली जाणार आहे. तर नो पार्कींगमधील वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पश्चिमच्या धर्तीवर आता पंचवटी व नाशिक रोड या दोन विभागांमध्ये देखील पार्कींग झोनची योजना राबविली जाणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी व नाशिकरोड परिसर महत्वाचा असल्याने या दोन्ही विभागांची निवड पार्कीग झोन्सकरीता करण्यात आली आहे.
नाशिक पश्चिम विभागामध्ये पार्किंगची स्थळे निश्चित केल्यानंतर आता त्या धर्तीवर पंचवटी व नाशिकरोड विभागात पार्कींग झोन्स विकसित केले जाणार आहेत.प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त, नाशिक महानगरपालिका.