

नाशिक : प्रायोगिक तत्त्वावर पश्चिम विभागातील २० किलोमीटर लांबीच्या २२ ऑनस्ट्रीट व ६ ऑफस्ट्रीट अशा २८ रस्त्यांवर २,३०५ ठिकाणी वाहनतळ निर्मितीच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला गुरुवारी (दि. १२) महापालिकेच्या महासभेत मंजुरी देण्यात आली.
पार्कींग प्रस्तावानुसार पार्किंग क्षेत्रात सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत या रस्त्यांवरील पार्किंग सशुल्क असणार आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहनतळांबरोबरच ‘नो पार्किंग’ क्षेत्र निर्माण केले जाणार असून, तेथे उभ्या केलेल्या दुचाकीसाठी ६००, तर बस व तत्सम अवजड वाहनांसाठी दोन हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे.
शहरातील वाहनतळांचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने पोलिस प्रशासनाच्या सहकार्यातून एक पाऊल टाकले आहे. स्मार्ट पार्किंगचा प्रकल्प अपूर्ण राहिल्यामुळे संबंधित ठेकेदाराने त्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. मध्यंतरी महापालिकेने संबंधित ठेकेदाराची समजूत काढून, आता आपल्या वाहतूक विभागामार्फत नव्याने स्मार्ट पार्किंगचे नियोजन केले आहे. प्रायोगिक तत्त्वावर नाशिक पश्चिम विभागातील वर्दळीच्या २२ रस्त्यांवर ऑनस्ट्रीट, तर सहा जागांवर ऑफस्ट्रीट अशा पद्धतीने २,३०५ जागांवर स्मार्ट पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यात १,८५० ठिकाणी ऑनस्ट्रीट, तर ४५५ ठिकाणी ऑफस्ट्रीट पार्किंग असेल. नो पार्किंग क्षेत्रात अनधिकृपणे वाहन पार्क केल्यास संबंधित वाहनधारकास जबर दंड ठोठावला जाणार आहे. दुचाकी उचलण्यासाठी चार टोइंग व्हॅन, तर तीनचाकी आणि चारचाकी वाहने उचलण्यासाठी सहा टोइंग व्हॅन असतील.
क्लॅम्पिंग चार्ज (जागेवर लॉक लावणे)
दुचाकी आणि तीनचाकी : ६०० रुपये
चारचाकी : ७२५ रुपये
अवजड वाहने / बस : २००० रुपये
टोइंग चार्जेस
दुचाकी आणि तीनचाकी : ७०० रुपये
चारचाकी : ११५० रुपये
पार्किंगमधून प्राप्त महसूल महापालिका, पोलिस व नियुक्त केल्या जाणाऱ्या एजन्सीत वाटप केले जाईल. ऑफस्ट्रीट पार्किंगमध्ये संपूर्ण रस्ते 'नो पार्किंग'मध्ये असतील, तेथे वाहने लावल्यास टोइंग केले जातील. टोइंगसाठी सहा वाहने राहतील. पोलिसांच्या मदतीने दंडवसुली होईल. ऑनस्ट्रीट पार्किंगमध्ये दर 200 मीटरमध्ये नो पार्किंग झोन व पार्किंग झोन असतील. यासंदर्भात महापालिका व पोलिस प्रशासनात सामंजस्य करार केला जाणार आहे.