नाशिक : कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी थेट गटारांमध्ये किंवा नजीकच्या नद्यांमध्ये सोडले जाते. यामुळे जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असून, स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. तसेच विषारी धुरामुळे हवा प्रदूषण होत आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व दोषी आढळणाऱ्या कंपन्यांविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल व पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक विभागाची मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे, उपसचिव तांत्रिक डॉ. राजेंद्र राजपूत, उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, जळगाव उपप्रादेशिक अधिकारी करणसिंग राजपूत, धुळे उपप्रादेशिक अधिकारी प्रणव पाखले, अहिल्यानगर उपप्रादेशिक अधिकारी चंद्रकांत शिंदे, वैज्ञानिक अधिकारी सुरेश माळी आदी उपस्थित होते.
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, नागरिकांकडून विविध प्रकारच्या तक्रारी प्राप्त होतात. त्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांनी प्रदूषण नियंत्रण, पर्यावरण संरक्षणावर भर देऊन स्थानिक नागरिकांच्या सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी व नदीप्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. यावेळी डॉ. अविनाश ढाकणे म्हणाले, प्रदूषण मंडळाच्या माध्यमातून नागरिकांना प्रदूषणमुक्त वातावरण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
तसेच उद्योजकांनी प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक उद्योगाला प्राधान्य द्यावे. तसेच उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी प्रदूषण मंडळ क्षेत्रातील प्रदूषण, सांडपाणी आदींबाबत केलेल्या उपाययोजनांबाबत स्लाइडद्वारे माहिती दिली.
नाशिक प्रदूषणमुक्तीसाठी प्रयत्न नाशिकला स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक निसर्ग वारसा लाभलेला आहे. हे वातावरण अबाधित राखण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असून, प्रदूषणमुक्त व पर्यावरण संतुलित हरित नाशिकसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.