देवळाली कॅम्पः येथील बार्ल्स स्कूलजवळील पाळदे मळ्यात तीन वर्षांची मादी बिबट जेरबंद करण्यात आली. पाळदे मळ्यातील रवींद्र पाळदे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी पहाटे ही बिबट मादी जेरबंद झाली. पाळदे मळ्यातील मागील बाजूस लष्कराच्या विभागात मोठे जंगल आहे. तिथे तीव्र उन्हामुळे पाणवठे आटल्याने वन्य प्राणी नागरी वस्तीकडे धाव घेत आहे.
काही दिवसांपूर्वी पाळदे मळ्यात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे पाळदे यांनी वन विभागाला पिंजरा ठेवण्याची मागणी केली होती. पिंजरा ठेवल्यानंतर केवळ चार दिवसांतच बिबट मादी जेरबंद झाली, पहाटे शेताला पाणी देण्यासाठी मोटर सुरू करण्याकरिता रवींद्र पुंडलिक पाळदे हे गेले असता, पिंजऱ्यामधून त्यांना बिबट्याच्या डरकाळ्यांचा आवाज ऐकू आला. याची माहिती त्यांनी तत्काळ वन विभागाला दिली. वन विभागाचे विजयसिंह पाटील, नाना गोपाळघरे, अशोक खानझोडे पिंजरा ताब्यात घेऊन नाशिक येथील गंगापूर रोपवाटिकेत बिबट हलविला आहे.
याच परिसरात आणखीही बिबटे असून त्यांनाही जेरबंद करावे, अशी मागणी सुनील पाटोळे, तानाजी चौधरी, उत्तम पाळदे, सुधीर पाळदे आदीसह रहिवाशांनी केली आहे.
दाट झाडांमुळे सुरक्षित मुक्काम
लॅम रोडवरील विविध सॅनिटोरियमसारख्या ठिकाणी असलेल्या मोठ्या झाडांमुळे आणि गारव्यामुळे तिथे बिबट्यांनी आपला मुक्काम ठोकला आहे. यामुळे भरवस्तीत आणि रस्त्यांवर रात्रीच्या वेळी बिबट्यांचे दर्शन होण्याचे प्रमाण वाढले आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत नजीकच्या जंगलातील पाण्याचे स्रोत आटल्यामुळे बिबट्या नदीकाठच्या मानवी वस्त्यांकडे वळतात. देवळाली परिसरातील बंगल्यांच्या बागा, सॅनिटोरियमची मोकळी मैदाने आणि दाट वृक्षराजी त्यांच्यासाठी नैसर्गिक निवारा ठरला आहे. नागरी वस्त्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या हे बिबट्यांच्या आगमनाचे मोठे कारण आहे. बिबट्यांसाठी कुत्रे हे सहज मिळणारे भक्ष्य आहे. तसेच या भागात असलेल्या सैनिकी छावणीत मोकळ्या जागांमुळे त्यांना वावरणे सोपे जाते.