

Jalna District Hit by Unseasonal Rains
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना जिल्ह्यात सोमवारी रात्री विजेच्या कडकडाटासह गाटपीट व अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अंबड तालुक्यातील महाकाळा ते साष्टपिंपळगाव रोडवरील नाथनगर येथे लिंबाच्या झाडावर वीज पडून दोन युवक ठार झाले. घनसावंगी तालुक्यातील रवना येथे वीज पडून एक बैल व गाय ठार झाली.
जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. रब्बी हंगामातील काढणीस आलेला गहू, ज्वारी व हरभरा या पिकाना अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. हवामान विभागाने जिल्ह्याला यलो अलर्ट दिल्यामुळे प्रशासनाने ३१ मार्च रोजी नागरिकांना काळजी घेण्याचा इशारा दिला आहे.
अंबड तालुक्यातील महाकाळा येथील गोविंद प्रल्हाद लहाने (२१) व आदित्य दगडे बेंद्रे (२०) हे सोमवार असल्यामुळे दर्शनासाठी आपेगाव येथे गेले होते. साष्टपिंपळगाव रोडवरील नाथनगर अचानक पाऊस सुरू झाल्याने ते लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. यावेळी ते थांबलेल्या लिंबाच्या झाडावर वीज पडल्याने त्या दोघांचा मृत्यू झाला.
जालना शहरात सोमवारी रात्री पडलेल्या अवकाळी पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. वारा व पावसामुळे शहरातील अनेक भागांत वीज पुरवठा खंडित झाल्याचे दिसून आले. अवकाळी पावसामुळे उशिरा पेरणी झालेल्या गहू, ज्वारी, हरभरा, कांदा बी सह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
वीज पडून बैल व गाय ठार घनसावंगी तालुक्यातील रवना येथे विजेच्या कडकडाटासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे दाणादाण उडाली. रवना येथे वीज पडल्याने ईश्वर रामेश्वर मागदरे यांच्या मालकीचा बैल व एक गाय ठार झाले. प्रशासनाने तत्काळ पंचनामा करून शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.