ओझर : शहर व परिसरात भटक्या श्वानांचा सुळसुळाट वाढला असून, झुंडीने फिरणाऱ्या भटक्या श्वानांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या श्वानांकडून विशेषत: लहान मुलांवर हल्ले होत आहेत. याकडे नगर परिषद प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
शहरातील शाळा, महाविद्यालये, दाट वस्तीचे भाग तसेच मुख्य रस्त्यांवर श्वानांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात गेल्या काही दिवसांत श्वानांनी चावा घेण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे अनेक जखमींना उपचार घ्यावे लागले आहेत. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांना शाळा -महाविद्यालयांत ये - जा करणेही धोकादायक ठरत असल्याचे चित्र आहे.
भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव लक्षात घेता ओझर नगर परिषदेकडून तातडीने ठोस उपाययोजना राबवण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. श्वानांचे निर्बीजीकरण, लसीकरण व पुनर्वसनासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात यावी तसेच नागरिकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष देण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वेळीच योग्य पावले उचलली नाहीत, तर एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नगर परिषद प्रशासनाने तत्काळ हालचाल करावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
नगर परिषद प्रशासनाकडून भटक्या श्वानांबाबत कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत. यामुळे एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो. भटक्या श्वानांंचा वाढता उपद्रव लक्षात घेता, नगर परिषद प्रशासनाने तत्काळ निर्बीजीकरण, लसीकरण व बंदोबस्ताची मोहीम राबवण्याची गरज आहे.सद्दाम पिंजारी