

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील १२ हजार ७४८ विहिरींच्या दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार विभागीय आयुक्तालयाच्या रोहयो विभागाने मागणीच्या ५० टक्के निधी म्हणजे ८ कोटी रुपये संबंधित जिल्ह्यांना वितरित केले आहेत. विहिरींचे काम पूर्ण होताच उर्वरित निधीही दिला जाणार आहे.
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात पिकांच्या नुकसानीसह असंख्य विहिरींची पडझड झाली होती, तर नदीकाठच्या विहिरींमध्ये गाळ साचून बुजून गेल्या. अशा विहिरींच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने रोहयो योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. बाधित शेतकऱ्यांकडून विहिरींचे प्रस्ताव मागविण्यात आले. तालुका पातळीवर प्रस्ताव एकत्रित केल्यानंतर त्याची जिल्हा पातळीवर तपासणी करण्यात आली. पात्र प्रस्तांवांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. या विहिरींच्या दुरुस्तीसाठी जिल्हा प्रशासनाकडून विभागीय प्रशासनाकडे निधीची मागणी करण्यात आली. अशा प्रकारे १२,७४८ विहिरींच्या दुरुस्तीसाठी १९ कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली.
सर्वाधिक ३ हजार ९९२ प्रस्ताव हे धाराशिव जिल्ह्यातील आहेत. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयाच्या रोहयो विभागाने मागणी केल्यानुसार पहिल्या टप्यात ३० हजार रुपयांपैकी १५ हजार रुपयांप्रमाणे ८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. हा निधी प्रशासनाला वर्गही करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून संबंधित लाभार्थीच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. बाधित शेतकऱ्यांनी विहिरींच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करताच उर्वरित ५० टक्के निधी खात्यावर वर्ग केला जाणार असल्याचे रोहयो विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अनंत गव्हाणे यांनी सांगितले.