नाशिक : नेपाळमध्ये आलेल्या जलप्रलयाचा फटका जिल्ह्यातील ५० हून अधिक पर्यटकांना बसला आहे. पंचवटीतील ४०, तर पेठ तालुक्यातील ११ नागरिक नेपाळमध्ये अडकले आहेत. रस्ते बंद झाल्यामुळे सध्या भारतात परतण्याचा मार्ग बंद आहे. परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता असल्यामुळे या पर्यटकांसमोर दैनंदिन खर्चासह अन्न, निवारा आणि सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी अडकलेल्या नाशिककरांनी केली आहे.
पेठ तालुक्यातील ११ जणांचा गट खासगी ट्रॅव्हल्सद्वारे गोरखपूरमार्गे नेपाळ पर्यटनासाठी गेला होता. या गटात अर्जुन शिंदे, रोहित शिंदे, विशाल शिंदे, रूपेश घोंगे, अभिषेक पवार, आकाश कोतुळकर, ओम शिंदे, पीयूष शिंदे, आयुष शिंदे, करण शिंदे आणि शुभम शिंदे यांचा समावेश आहे. हे सर्वजण सध्या काठमांडूत अडकल्याची माहिती मिळाली आहे.
जलप्रलयामुळे अनेक ठिकाणी रस्ते आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. परतीचे मार्ग बंद झाले आहेत. या पर्यटकांचा परतीचा प्रवास गुरुवारी (दि. २७) नियोजित होता. मात्र, त्यापूर्वीच निर्माण झालेल्या आपत्तीमुळे त्यांचा परतीचा प्रवास खोळंबला आहे. भारतात परतण्यासाठी आवश्यक रस्ते आणि वाहतूक व्यवस्था पूर्ववत होण्यास किमान १० ते १५ दिवस लागू शकतात, अशी माहिती मिळाल्यामुळे पर्यटकांची चिंता वाढली आहे.
या पर्यटकांनी नेपाळमधील आपला थरारक अनुभव सांगितला. मनकामेन देवीचे दर्शन घेऊन पुढील प्रवासासाठी निघाल्यानंतर अवघ्या दोन तासांतच नेपाळमध्ये जलप्रलयाची परिस्थिती निर्माण झाली. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, वेळीच सुरक्षित ठिकाणी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. 'दैव बलवत्तर म्हणूनच आम्ही बचावलो आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचलो.' अशी प्रतिक्रिया या पर्यटकांनी दिली.
पंचवटीतील ४० नागरिक नेपाळमध्ये अडकले आहेत. हे नागरिक इंडो- नेपाळ ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून नेपाळ पर्यटनासाठी गेले होते. सध्या ते भारत नेपाळ सीमेवर असून, परतीचा मार्ग मोकळा होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. या गटातील नागरिकांबाबत अधिकृत आणि सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्यांच्यासमोर आर्थिक अडचणीही निर्माण झाल्या आहेत. हॉटेल, अन्न, स्थानिक प्रवास तसेच इतर दैनंदिन खर्चाचा अतिरिक्त भार त्यांच्यावर पडत आहे.
त्यातच नैसर्गिक आपत्तीमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्यामुळे नेमके किती दिवस अडकून राहावे लागेल, याबाबतही निश्चितता नसल्यामुळे नाशिकमधील कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. दरम्यान, जलप्रलयामुळे नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने नेपाळ प्रशासनाशी समन्वय साधावा. गरज भासल्यास विशेष वाहतूक व्यवस्था करून त्यांना भारतात परत आणावे, अशी मागणी नाशिककरांकडून होत आहे.
'त्या' ११ पर्यटकांबाबत संदिग्धता
नाशिकमधून नेपाळला गेलेल्या ११ पर्यटकांबाबत जिल्हा प्रशासनाकडे अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही. अज्ञात व्यक्तीने दूरध्वनीवरून नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कार्यालयाशी संपर्क साधून ११ जण नेपाळला गेल्याची माहिती दिली. यामध्ये 'शिंदे' नावाच्या व्यक्तीचा समावेश असल्याचेही सांगण्यात आले. मात्र, माहिती देणाऱ्या व्यक्तीने प्राधिकरणाला दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर अधिकाऱ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या माहितीच्या सत्यतेबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती राज्य शासनाला दिली असून प्रशासनाकडून माहितीची पडताळणी केली जात आहे.