

नाशिक : प्रफुल्ल पवार
जन्मदात्या आई वडिलांची ओळखही नसलेल्या किंवा परिस्थितीच्या दुष्टचक्रामुळे निराधार झालेल्या बालकांच्या आयुष्यात नाशिकच्या आधाराश्रमाने मायेचा किरण निर्माण केला. संस्था स्थापनेपासून आतापर्यंत ७५ अनाथ व निराधार बालकांना स्पेन, इटली, अमेरिका, स्वीडन आणि न्यूझीलंडमधील कुटुंबांनी दत्तक घेतले आहे. एक हजारहून अधिक बालकांचे पुनर्वसन देशातील कुटुंबांत करण्यात आले आहे. एका बाजूला बालकांना कुटुंबाची ऊब मिळत असली, तरी दुसरीकडे जन्मदात्यांकडूनच मुलांना वाऱ्यावर सोडण्याची वाढती प्रवृत्ती समाजाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
महिला व बालविकास विभागाच्या नियमानुसार यंदा ६ मुले आणि ७ मुली देशातील कुटुंबांना, तर एका बालकाला परदेशातील कुटुंबाला दत्तक देण्यात आले. संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत परदेशातील विविध कुटुंबांनी ७५ बालकांना आपलेसे केले आहे. सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुले निराधार होण्याचे प्रमाण वाढत आहे.
यात अनैतिक संबंधांतून जन्मलेल्या बाळाला वाऱ्यावर सोडून दिल्याच्या घटना सर्रास घडत आहेत. अशा निरपराध बाळांना शासनाच्या जिल्हा बालविकास कार्यालयाकडून संगोपन करून त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या संमतीने दत्तक दिले जाते. पण हे विदारक चित्र कधी बदलणार असा प्रश्न निर्माण होत आहे.
दोन मुलींच्या प्रवेशाने सुरू झालेल्या आधाराश्रमात आजमितीस ८० बालकांचे संगोपन केले जाते. जन्मापासून सहा वर्षांपर्यंतच्या मुलांसह एक दिवसापासून १८ वर्षांपर्यंतच्या मुलींचे संगोपन आधाराश्रमात होत आहे. बालकल्याण समितीच्या माध्यमातून वर्षभरात १० मुले आणि ९ मुली अशी १९ मुले या आधाराश्रमात दाखल झाल्याची नोंद आहे. यावरून अधिकृत दत्तक देण्याचे प्रमाण वाढत असून, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील परिस्थितीमुळे मुलांना अनधिकृत दत्तक दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अशा अनधिकृत घटनांकडे काटेकोरपणे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. यामुळे अनेक बालकांवर होणारे अत्याचार, बाजमजुरी अशा घटनांना आळा घालण्यास मदत होईल. या पार्श्वभूमीवर कायदेशीर दत्तक प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित होते. दत्तक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही बालकांच्या संगोपनावर लक्ष ठेवले जाते. दत्तक दिल्यानंतर दोन वर्षांपर्यंत बालकाच्या प्रगतीचा पाठपुरावा केला जातो.
बालक दत्तक घेण्यासाठी केंद्र
शासनाने निश्चित केलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता, अधिकृत शासकीय प्रक्रियेतूनच दत्तक घ्यावे. घरच्या घरी किंवा अनधिकृत पद्धतीने बालक दत्तक घेणे टाळावे. असे केल्यास पालकांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.
- सुनील दुसाने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी
बालक दत्तक घेण्यासाठी केंद्र
शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागला, तरी संयम ठेवावा. कोणत्याही आमिषाला बळी न पडता, कायदेशीर मागनिच दत्तक प्रक्रिया पूर्ण करावी. माहिती नसल्यास नाशिकच्या आधाराश्रमात संपर्क साधावा.
- राहुल जाधव, सीओओ, आधाराश्रम, नाशिक
अनाथ होण्यामागील कारणे
बालक अनाथ होण्यामागे आई वडिलांचा मृत्यू हे एकमेव कारण नसते. कौटुंबिक कलह, व्यसनाधीनता, विवाहबाह्य संबंधांतून जन्मलेली बालके, गंभीर आजार, पालकांचे विभक्त होणे अशा कारणांमुळे बालके निराधार होतात. बालकांना बेकायदेशीररीत्या दत्तक देण्याचे प्रकारही समोर येतात. अशा घटनांमुळे बालकांच्या भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो.
मायेच्या घराची नवी वाट
आधाराश्रमात बालकांना केवळ निवारा दिला जात नाही, तर शिक्षण, आरोग्य, संगोपन आणि सुरक्षित वातावरण देत त्यांचे पुनर्वसन केले जाते. आई वडिलांची माया न मिळालेल्या बालकांना दत्तक प्रक्रियेतून कुटुंब मिळवून देण्याचे काम संस्था करते. परदेशातील ७५ बालकांच्या आयुष्यात नव्या कुटुंबामुळे मायेची नवी सुरुवात झाली आहे.
दत्तक प्रक्रियेसाठी कायदेशीर मार्ग
बालक दत्तक घेण्यासाठी केंद्राच्या नियमांनुसार अधिकृत प्रक्रियेतूनच अर्ज करावा. इच्छुक पालकांनी शासकीय संकेतस्थळावर नोंदणी करीत आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. पात्रता निश्चित झाल्यानंतर उपलब्ध बालकाची माहिती देण्यात येते. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने बालक दत्तक दिले जाते. अनधिकृत पद्धतीने बालक दत्तक घेणे कायदेशीरदृष्ट्या टाळावे.