

लासलगाव : येथून रेल्वेमार्गे दिल्लीला पाठविण्यात आलेला कांदा पोहोचल्यानंतर तो ग्राहकांना ३५ रुपये किलो दराने किरकोळ विक्री करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. देशांतर्गत कांद्याची उपलब्धता समाधानकारक असल्यामुळे कांदा निर्यातीवर नवीन निर्बंध लादण्याची शक्यता सरकारने फेटाळून लावली आहे. त्याऐवजी बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणून वाढत्या किरकोळ दराला लगाम घालण्यावर केंद्राचा भर आहे.
ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी गुरुवारी (दि. २७) सांगितले की, आगामी काही महिन्यांतील देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी देशात पुरेसा कांदा उपलब्ध आहे. त्यामुळे निर्यात रोखण्याऐवजी बफर स्टॉक आणि बाजारातील हस्तक्षेपाचा वापर केला जाणार आहे. २०२५-२६ मध्ये देशातील कांद्याचे अंदाजित उत्पादन ३०७. ३७ लाख मेट्रिक टन असून, मागील वर्षी ते ३०७.६७ लाख मेट्रिक टन होते. यंदाच्या उत्पादनात मोठी घट नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
दरम्यान, सणासुदीच्या काळात कांद्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन, केंद्राने बफर स्टॉकमधील कांदा टप्प्याटप्प्याने बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीमध्ये NCCF आणि NAFED च्या फिरत्या गाड्या तसेच विविध विक्री केंद्रांमधून ३५ रुपये किलो दराने कांदा विक्री केली जाणार आहे.
केंद्राने २०२६-२७ च्या किंमत स्थिरीकरण निधीअंतर्गत दोन लाख मेट्रिक टन कांदा बफरसाठी खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, आतापर्यंत सुमारे १.२१ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला आहे. दिल्लीबरोबरच चेन्नई, कोलकाता, एर्नाकुलम, गुवाहाटी, वाराणसी, लखनऊ, पाटणा, चंदिगड, जम्मू आणि अमृतसर या ग्राहक केंद्रांमध्येही कांदा रेल्वे व रस्तेमार्गे पाठविला जात आहे.
३५ रुपये किलो दराने सरकारी कांदा बाजारात आल्यास ग्राहकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारच्या मोठ्या प्रमाणातील बाजार हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांच्या बाजारभावावर दबाव येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. साठवणूक करून ठेवलेल्या कांद्याचा खर्च, वाहतूक आणि उत्पादन खर्च वाढलेला असताना, कमी दराने सरकारी कांदा उपलब्ध झाल्यास बाजारातील दर खाली येऊ शकतात, अशी चिंता शेतकरी वर्गामधून व्यक्त होत आहे.
'कांदा एक्सप्रेस'ने वाहतूक
लासलगावहून दिल्ली आणि इतर प्रमुख शहरांमध्ये कांद्याची जलद वाहतूक करण्यासाठी सरकारने 'कांदा एक्सप्रेस' ही विशेष मालगाडी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ५०० मेट्रिक टन कांदा दिल्लीत पाठविण्यात आला असून, त्यानंतर चेन्नई, कोलकाता आणि गुवाहाटीसारख्या शहरांमध्येही साठा पाठविला जात आहे.
सवलतीच्या दरात विक्री
NCCF, NAFED, केंद्रीय भांडार आणि सफालच्या रिटेल आउटलेट्स तसेच मोबाइल व्हॅन्सद्वारे सर्वसामान्यांना ३५ रुपये किलो दराने कांदा उपलब्ध करून दिला जात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे घाऊक बाजारातील कांद्याच्या सरासरी दरात अवघ्या दोन दिवसांत सुमारे ४५० रुपयापर्यंत घसरण झालेली पाहायला मिळाली.