सिझरिंगसाठी हलविले जात असताना गरोदर महिलेची काही वेळातच नॉर्मल प्रसूती झाल्याने ग्रामीण रुग्णालयाचा अनागोंदी कारभार यानिमित्ताने उघड झाला आहे.  (छाया : सचिन बैरागी)
नाशिक

Nashik: राज्याच्या आरोग्य यंत्रणेची अब्रू चव्हाट्यावर; एकीकडे डॉक्टरच मद्यधुंद अवस्थेत, दुसरीकडे लेकीचा मृतदेह पिशवीतून नेला गावी

Nandgao Rural Health Case Centre | नांदगाव ग्रामीण रुग्णालयातील प्रकार; शिवसैनिकांकडून कर्मचाऱ्यांना चोप

पुढारी वृत्तसेवा

Nandgaon Rural Health Care Centre

नांदगाव (नाशिक) : येथील ग्रामीण रुग्णालयातील अनागोंदी, बेशिस्त आणि निष्काळजीपणाचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. प्रसूतीसाठी दाखल झालेल्या आदिवासी विवाहितेला दिवसभर त्रास सहन करत बसवून ठेवले आणि अखेर नॉर्मल प्रसूती शक्य नाही, असा बनाव करून सिझेरियनसाठी खासगी रुग्णालयात रेफर करण्याचा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, या प्रकरणात संबंधित डॉक्टर व कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत आढळल्याने शिवसैनिकांनी त्यांना जाब विचारत चांगला चोप दिला

जामदरी येथील १९ वर्षीय विवाहिता सोनाली आकाश मोरे हिला सकाळी 6 च्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तिला, अजून वेळ आली नाही, असे सांगून थांबवले आणि रक्तासाठी १,००० रुपये मागितले. प्रसूती वेदना तीव्र होत असतानाही दुर्लक्ष करण्यात आले. नंतर तिची नॉर्मल डिलिव्हरी शक्य नाही, असा खोटा निष्कर्ष देत तिला खासगी रुग्णालयात रेफर करण्याचा प्रयत्न केला.

शिवसेनेचे भाऊराव बागूल यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. त्यावेळी रुग्णालयातील मद्यधुंद डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. ही माहिती युवा सेनेचे जिल्हाप्रमुख फरहान खान यांच्यापर्यंत पोहोचताच ते शिवसैनिकांसह रुग्णालयात धडकले. त्यावेळी डॉ. शांताराम राठोड हे पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. संतप्त शिवसैनिकांनी त्यांना जाब विचारला, मात्र ते खुलासा करण्याच्या स्थितीत नसल्यामुळे त्यांना चांगलाच धडा शिकवण्यात आला. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षिका डॉ. काजल तुसे यांना बोलावण्यात आले. त्यांनीच प्रसूती केली आणि सोनाली मोरेची नॉर्मल डिलिव्हरी करत कन्यारत्न प्राप्त झाले.

दरम्यान, संबंधितांविरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी पीडितेच्या नातेवाइकांनी केली आहे. एकीकडे रुग्णालयात मद्यधुंद कर्मचारी, दुसरीकडे गर्भवती महिलांवर होणारा अन्याय, प्रशासनाचे डोळे उघडणार कधी, असा सवाल संतप्त ग्रामस्थ व शिवसैनिकांनी केला आहे.

दोषींवर कारवाईचे जिल्हा शल्यचिकित्सकांचे आश्वासन

या प्रकारामुळे ग्रामीण रुग्णालयातील बेजबाबदार कारभाराचे गंभीर दर्शन घडले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिंदे यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत, डॉ. राठोड, डॉ. काजल तुसे, परिचारिका गिरीजा कुलकर्णी व कर्मचारी अतुल आठवले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

जिल्हा शासकीय रुग्णालय, नाशिक

रुग्णवाहिका नाकारल्याने नवजात लेकीचा मृतदेह पिशवीतून नेला गावी

Father carries baby’s dead body in bag after ambulance denied in Nashik

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयाने रुग्णवाहिका नाकारल्यामुळे पालघर जिल्ह्यातील एक पित्याने आपल्या नवजात मुलीचा मृतदेह चक्क एका पिशवीत टाकून एसटीने सुमारे ९० किलोमीटरचा प्रवास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पालघर जिल्ह्यातील जोगळवाडीत राहणारे आदिवासी मजूर सखाराम कवर (२८) त्यांच्या पत्नी अविता (२६) यांना ११ जूनला सकाळपासून प्रसुतीवेदना सुरू झाल्या. तिला एका खासगी वाहनातून खोडाळा आरोग्य केंद्रात नेण्यात आले. यावेळी १०८ क्रमांकावर संपर्क करून देखील रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. तिची प्रकृती अधिकच खालावल्याने, तिला बुधवारी (दि. ११) रात्री १० वाजेच्या सुमारास नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मोखाडा येथील आरोग्य केंद्रात बाळाचे ठोके लागत होते. मात्र, शासकीय रुग्णालयात ठोके लागत नसल्याने, अविताचे तत्काळ सीझर करून मृत बाळ पोटातून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, आरोग्य व्यवस्थेच्या हलगर्जीपणामुळेच माझे बाळ दगावल्याचा आरोप सखाराम याने केला. दगावलेल्या अर्भकाला गावी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी त्याने मागणी केली. मात्र, ती नाकारल्याने, सखारामने पिशवीतच मृत अर्भकाला गावी आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रुग्णालयाचा खुलासा

गर्भवतीचे अर्भक पोटातच दगावल्याच्या शक्यतेची रेफरलशीट आहे. अर्भकावर नाशिकमध्येच अंत्यसंस्कार करण्याची माहिती देऊन बॉडी वडिलांकडे हस्तांतरीत केली होती. त्यांनी कोणत्याही प्रकारची रुग्णवाहिका मागितली नाही. तसेच मृतासाठी रुग्णवाहिका दिली जात नाही. डिस्चार्ज देताना गावी जाण्यासाठी रुग्णवाहिका नको, खासगी दुचाकीने जाणार असल्याचे सखारामने सांगितले होते, असा खुलासा जिल्हा रुग्णालयाकडून करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT