

नाशिक : नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत महायुतीतीतल भाजप, राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गट व शिवसेना (शिंदे गट) यांच्या रस्सीखेच सुरू आहे.
पालकमंत्री पदावर राष्ट्रवादीचा दावा करणारे राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी, पालकमंत्र्यांबाबत फार वाद नाहीत. पालकमंत्री पदावर कुणाचाही दावा नाही. मुख्यमंत्री निर्णय घेतील आणि तो सर्वांना मान्य असेल, असे सांगितले. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ कोकाटे यांच्या विधानाने पालकमंत्री पदाबाबत राष्ट्रवादीने माघार घेतली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे
नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून रस्सीखेच सुरू आहे. या पदासाठी भाजपचे गिरीश महाजन आणि शिंदे गटाचे दादा भुसे आपापल्या पक्षातून आघाडीवर आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांचेही नाव चर्चेत आहे. यात अलीकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्याने, नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीत त्यांचेही नाव पुढे आले आहे. त्यामुळे या पदासाठी आता चार संभाव्य दावेदारांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
त्यातच, मंत्री भुजबळ यांनी पालकमंत्र्यांबाबत मी नाशिकचा बालक आहे, पालक म्हणून मी नाशिकच्या विकासासाठी कायमच काम करत असतो. पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असे सांगितले. या पाठोपाठ राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार असल्याने राष्ट्रवादीचा पालकमंत्री पदावर दावा असल्याचे सांगणारे मंत्री कोकाटे यांनी पालकमंत्री पदाबाबत वाद नसल्याचे सांगितले. तसेच कोणाचाही दावा नसल्याचेदेखील स्पष्ट केले आहे. त्यामुळे जलसंपदामंत्री गिरीश महाराज यांचा पालकमंत्री पदाचा मार्ग सुकर होत चालल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.