

नाशिक : लाच घेतल्याच्या आरोपातून श्री विश्वेश्वर मुंबादेवी शैक्षणिक आणि सामाजिक विकास मंडळाच्या सचिव आशादेवी फकिरराव अहिरराव आणि त्यांचे पुत्र ॲड. परमदेव फकिरराव अहिरराव यांची जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
तक्रारकर्त्याने अहिरराव यांना दिलेली रक्कम ही 'जय महाराष्ट्र ओम त्र्यंबकराज अनाथ बालक आश्रामा'त प्रवेशासाठी नव्हे तर, श्री विश्वेश्वर मुंबादेवी शैक्षणिक आणि सामाजिक विकास मंडळ या ट्रस्टद्वारे चालविल्या जाणाऱ्या विनाअनुदानित संस्थेत प्रवेशासाठी शुल्क म्हणून दिली होती, हे पुराव्याअंती सिध्द झाल्याने न्यायालयाने अहिरराव द्वयींची गुन्ह्यातून मुक्तता केली आहे. या प्रकरणात अधिकाराचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात अहिरराव यांनी जिल्हा न्यायालयात फौजदारी व दिवाणी खटला दाखल केला आहे.
अहिरराव यांच्या संस्थेमार्फत त्र्यंबकरोडवर जय महाराष्ट्र ओम त्र्यंबकेश्वर निराश्रित अनाथ बालक आश्रम या नावाने अनाथालय चालविले जाते. अनाथलयात दाखल करण्यासाठी अहिरराव यांनी लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपात प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्या तक्रारीवरून अहिरराव यांच्यावर मार्च २०१९ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईला अहिरराव यांनी जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते. अतिरक्त सत्र न्यायधीश नितीन जिवणे यांच्यासमोर यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही बाजु ऐकून घेतल्या. या प्रकरणात अनाथालयात दाखल करण्यासाठी अहिरराव यांनी २८५० रुपये लाच घेतल्याचा आरोप होता. तक्रारदाराच्या नातवाला जय महाराष्ट्र अनाथ बालकाश्रमात प्रवेश देण्यात आला नव्हता. श्री विश्वेश्वर मुंबादेवी शैक्षणिक आणि सामाजिक विकास मंडळाच्या विनानुदानित संस्थेत प्रवेश देण्यात आला होता. ती संस्था सरकार मान्यताप्राप्त होती. परंतू ती संस्था चालविण्यासाठी अहिरराव यांना कोणतीही सरकारी मदत मिळत नव्हती. त्यामुळे या संस्थेत ठेवलेल्या मुलांच्या देखभालीचा खर्च उचलण्यासाठी प्रतिमाह ७०० रुपये आकारले जात होते. जय महाराष्ट्र अनाथ बालकाश्रमात प्रवेश देण्यासाठी अहिरराव यांनी कोणतीही लाच मागितली नव्हती हे न्यायालयात पुराव्यानिशी सिध्द झाले. जय महाराष्ट्र ओम त्र्यंबकराज अनाथ बालक आश्रमात त्यावेळी फक्त १३ मुलांना ठेवण्यात आले होते. सरकारने फक्त त्या १३ अनाथांसाठी अनुदान दिल्याची नोंद तपासात पुढे आली. तक्रारदाराच्या नातवाचे नाव त्यात समाविष्ट नसल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्यातून न्यायालयाने अहिरराव यांची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयात अर्जदार अहिरराव यांच्यावतीने ॲड. योगेंद्रदेव अहिरराव यांनी काम पाहिले.
या प्रकरणात आपल्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचे आशादेवी अहिरराव यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अधिकाराचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात अहिरराव यांनी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात दिवाणी व फौजदारी खटला दाखल केला आहे. संबंधितांविरोधात कठोर कारवाईची होऊन न्याय मिळावा, अशी मागणी अहिरराव यांनी केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचतेवेळी संदर्भातील प्रवेशित हा विनाअनुदानित संस्थेतील आहे की अनुदानित याची खात्री न करता गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी मृदुला नाईक, पंच बाळु बंदावणे, मनिषा निकम व इतर अधिकाऱ्यांनी आपल्याविरोधात कारवाई करून बदनामी केली. त्यामुळे सामाजिक कार्याचे नुकसान झाल्याचे ॲड. परमदेव अहिरराव यांनी सांगितले.