नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापलेले असताना, ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी यावर महत्त्वाची भूमिका मांडली आहे. मनोज जरांगे यांची लढाई आमच्या विरोधात नाही, त्यावर आम्ही काय बोलणार? सरकार त्यावर बोलेल आणि योग्य तो निर्णय घेईल, असे स्पष्ट वक्तव्य मंत्री भुजबळ यांनी केले आहे.
रविवारी (दि. २३) नाशिक येथे माध्यमांशी बोलताना मंत्री भुजबळ यांनी सरकारची भूमिका आणि ओबीसी समाजाच्या मागण्यांवर सविस्तर भाष्य केले. लक्ष्मण हाके यांच्या भूमिकेबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, ओबीसींचे आरक्षण संपले असे कोण म्हणते, आरक्षण संपलेले नाही.
जात पडताळणी प्रक्रियेत जर काही चुका किंवा त्रुटी असतील, तर त्याविरोधात आम्ही लढा देत आहोत. २०११ पासून जात जनगणना करावी ही आमची सातत्यपूर्ण मागणी होती आणि त्यावर सरकारने आता सकारात्मक निर्णय घेतला आहे. सरकार आमच्या पाठीशी आहे, त्यामुळे आम्ही चर्चेच्या माध्यमातूनच मार्ग काढत आहोत, असे त्यांनी सांगितले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या मागण्यांवर बोलताना भुजबळ म्हणाले की, जरांगे-पाटलांचे आंदोलन हे आमच्याविरोधात नसून सरकारच्या स्तरावरचा विषय आहे. आम्ही जात जनगणनेची मागणी केली होती आणि त्यावर सरकार काम करत आहे.
ओबीसींमध्ये किती जाती आहेत आणि नाव कसे समाविष्ट करायचे, यावर सरकार निर्णय घेईल. प्रत्येक राज्यात ओबीसींची नावे शोधण्याचे काम सध्या सुरू आहे. जेव्हा लढायची वेळ आली, तेव्हा आम्ही मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राज्यभर फिरलो आहोत. त्यामुळे भुजबळ कोणाला घाबरला, असा सवालच येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
भुजबळ यांनी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. तुकाराम मुंडे चांगले काम करत आहेत. अन्न हा असा घटक आहे जो गरीब आणि श्रीमंत सर्वांनाच आवश्यक असतो. त्यामुळे तिथे स्वच्छता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुकाराम मुंडे ज्या मुद्द्यांवर बोट ठेवतात, त्यावर सगळेच सुधारणांची मागणी करतात. तशीच रास्त मागणी अंगणवाडी कृती समितीने केली आहे, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.