Vidit Gujrathi interview : नाशिक ते ग्रँड स्विस टूर्नामेंट... ग्रँडमास्टर विदित गुजराथींचा 'अर्जुन' ठरण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
नाशिक : अंजली राऊत
भारतीय बुद्धिबळपटू विदित संतोष गुजराथी यांनी बुद्धिबळ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत देशाचे नाव उंचावले आहे. त्यांच्या उत्कृष्ट योगदानाची दखल घेत त्यांना प्रतिष्ठित ‘अर्जुन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नाशिकच्या भूमीतून घडलेल्या विदित यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले असून जाणून घेऊया त्यांच्याकडूनच आमच्या प्रतिनिधी अंजली राऊत यांनी केलेली बातचीत....
१. तुमची बुद्धिबळाशी ओळख कशी झाली आणि सुरुवातीच्या काळात तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला?
विदित गुजराथी : मी लहानपणी वेगवेगळे स्पोर्ट्स खेळायचो. यामध्ये क्रिकेटही होतं तसेच चेसही होते. मी घरी बाबांसोबत खेळायचो. त्यामुळे मला त्याच्यात एक रुची होती आणि मला हारायला अजिबात आवडायचं नाही. त्यावेळी बुद्धिबळ खेळून शिकून बाबांसोबत जिंकेन. ॲज अ हॉबी सुरू झालं होतं आणि त्यानंतर मग मी टूर्नामेंट्स खेळायला लागलो, चांगलं करायला लागलो तर त्याच्यामध्ये अजून रुची वाढली. नक्की तिकडे खूप कष्ट होते, कारण की ट्रेनिंग, ट्रॅव्हल करणं याचे खूप वेगवेगळे खर्च होते. कोणालाही माहीत नव्हतं की चेसमध्ये कसं पुढे जायचं, कारण की एवढे प्लेयर्स नव्हतेच महाराष्ट्रामध्ये. एक नवीन वाटेवरती आम्हाला चालायचं होतं आणि काही डायरेक्शन्सच नाहीयेत. पण मी लकी होतो की मला बरेच गुरू मिळाले. त्यांनी मला गायडन्स दिला. माझे पेरेंट्सनीही खूप मेहनत घेतली आणि बहिणीने सुद्धा. तर त्यामुळे मी त्यांचा खूप... आणि त्यांच्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे.
तुमच्या या यशात आणि ग्रँडमास्टर होण्याच्या प्रवासात कुटुंबाचा किती महत्त्वाचा वाटा राहिला आहे?
विदित गुजराथी : फॅमिलीचा खूप मोठा रोल होता. कारण की फॅमिली किंवा घरचा सपोर्ट नसेल, तर तुम्ही काहीच नाही बनू शकत. एवढ्या टॉप लेव्हलवरती नाही खेळू शकत. कारण की याच्यामध्ये सगळ्यांचा सॅक्रिफाइस असतो. माझ्या आईने माझ्यासाठी खूप काही केले आहे. त्यांची प्रॅक्टिस काही वेळासाठी सोडली होती. ती माझ्यासोबत टूर्नामेंट्सला यायची. माझी बहीण सुद्धा शाळा मिस करून माझ्यासोबत यायची. बाबा घरी सगळं सांभाळायचे. खूप कष्टाचे दिवस त्यांनी पाहिले आहेत. आय थिंक त्यांनी केलेला त्याग आणि त्याच्याच मेहनतीचे हे फळ मला मिळते आहे. त्यांच्याशिवाय काहीच होऊ शकलं नसतं.
एका ग्रँडमास्टरची रोजची दिनचर्या कशी असते? दररोज किती तास सराव करतात?
विदित गुजराथी : हो, तसं तुम्हाला मेहनत करावी लागते. कारण की याच्यात रोज तुम्ही समजा, समजा प्रॅक्टिस करणार तर रोज तुम्ही काही नवीन शिकणार. असा बुद्धिबळ हा गेम आहे आणि किती मेहनत केली तरी कमी आहे. पण तरी समजा सांगितलं तर ८ ते १० तास एका टॉप प्लेयरला लागतात मेहनत करायला, समजा तुम्हाला एट द व्हेरी बेस्ट खेळायचं आहे तर. मानसिक ताण तर असतोच; पण आता मी त्याच्यासाठी तयारी करतो. मी रोज मेडिटेट करतो, त्याने माझी हेल्प होते. तुम्ही एवढं खेळता की तुम्ही टेक्निक्स वगैरे शिकता. त्याचं रूट तर एकच आहे की मनावरती नियंत्रण आणायचं. हो, भारतात खूप बुद्धिबळ खेळ वाढीस लागत आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. या खेळात आता आपण वर्चस्व गाजवत आहोत. असं म्हणतात की पुढचे दशक भारताचेच आहे.
तुमच्या संपूर्ण कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात संस्मरणीय आणि भावनिक क्षण कोणता आहे?
विदित गुजराथी : असे तर खूप क्षण आहेत; पण अलीकडचा विचार केला, तर २०२३ मध्ये ग्रँड स्विस टूर्नामेंट होती. यामध्ये जगातील १०० टॉप प्लेयर्स सहभागी झाले होते. वर्ल्डची स्ट्रॉंगेस्ट ओपन टूर्नामेंट होती ती. तिकडे मी पहिला राउंड हारलो होतो. त्यानंतर मी जिंकलो. ती टूर्नामेंट, सगळ्या स्ट्रॉंग प्लेयर्सला हरवून. मला असं वाटतं की माझ्या आतापर्यंतच्या लाईफचा बेस्ट परफॉर्मन्स होता तो. त्यामुळे मला तो क्षण खूप आनंद देतो.
प्रतिष्ठित 'अर्जुन' पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर तुमच्या भावना काय आहेत?
विदित गुजराथी : मला नक्कीच आनंद होतोय की, अर्जुन अवॉर्ड मिळाला आहे. अशा पुरस्कारामुळे आय थिंक याने एक वेगळी विश्वासार्हता मिळते. तुम्ही मेहनत तर करताच, पण जेव्हा सरकार तुमचा सन्मान करते आणि तुमच्या कामगिरीची दखल घेते तेव्हा खूप चांगलं वाटतं.
मोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना मानसिक ताण कसा हाताळता?
विदित गुजराथी : मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी मी तयारी करतो. रोज ध्यान (Meditation) करतो. यामुळे मला मदत होते. तुम्ही कोणत्याही खेळातील तंत्र आणि कौशल्ये शिकलात, तरी त्याचा मूळ पाया एकच आहे, आपल्या मनावर नियंत्रण मिळवणे. भारतात हा खेळ खूप वाढला आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे.
तुमचे पुढचे मोठे ध्येय काय आहे आणि त्यासाठी स्पर्धांची तयारी कशी सुरू आहे?
विदित गुजराथी : पुढच्या महिन्यात सप्टेंबरमध्ये ४५ वी ऑलिम्पियाड स्पर्धा आहे. सध्या तिचीच तयारी सुरू आहे. युवा खेळाडूंना मी हेच सांगेन की, मनात कुतूहल ठेवा. तुम्ही दररोज काही ना काही नक्कीच शिकाल. केवळ बक्षीस किंवा फायद्याच्या अपेक्षेने खेळू नका. कारण बुद्धिबळात जर तुम्हाला खेळाडू बनायचे असेल, तर सुरुवातीला सहजासहजी फळ किंवा यश मिळणार नाही, पण तुम्ही सातत्याने मेहनत करत राहिलात, तर एका ठरावीक वेळेनंतर तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळेल.
युवा बुद्धिबळपटूंनी जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी काय करावे लागेल?
विदित गुजराथी : नाशिकमध्येही असे अनेक खेळाडू असतील जे उत्तम खेळतात. पण मला वाटते की, मी अतिशय कमी लोकांमध्ये ती भूक पाहिली आहे. त्यागाची, अत्यंत मेहनत करण्याची आणि एका टप्प्यावर तुम्हाला तुमचा सोयीचा भाग (कंफर्ट झोन) सोडावा लागतो, खूप चांगला खेळाडू बनायचे असेल तर. मला वाटते की, असा त्याग करण्यासाठी खूप मनोबल लागते. आजकाल इंटरनेटमुळे मार्गदर्शन आणि ज्ञान खूप सहज उपलब्ध झाले आहे. त्यामुळे मला वाटते की, जर तुम्ही मनाचे बळ एकत्र केले, तरच हे शक्य होऊ शकते.

