नाशिकरोड : प्रफुल्ल पवार
कोणी रागाच्या भरात घर सोडले... कोणाचा प्रेमभंग... कोणाची प्रवासादरम्यान झालेली ताटातूट, तर कोणी ताणतणातून वाट चुकलेले अशा विविध कारणांनी कुटुंबापासून दुरावलेल्या १७१ अल्पवयीनांना रेल्वे पोलिसांनी 'नन्हे फरिस्ते' ऑपरेशन अंतर्गत पुन्हा कुटुंबीयांकडे सोपविले. यामुळे वाट चुकलेल्या या मुलांसाठी रेल्वे पोलिस फरिश्ते ठरल्याची भावना व्यक्त होत आहे.
भुसावळ विभागातील नाशिकरोड रेल्वेस्थानकात मागील वर्षभरात राबविण्यात आलेल्या 'ऑपरेशन फरिश्ते' अंतर्गत ही उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली. यात ९३ मुली व ७८ मुलांचा समावेश आहे. राज्यातील संवेदनशील रेल्वेस्थानकांमध्ये नाशिकरोड रेल्वेस्थानकाचा समावेश आहे.
राज्यात कुठल्याही संवेदनशील घटनेतंतर नाशिकरोड स्थानकात आलर्ट करत सुरक्षा कडक केली जाते. त्यामुळे येथील रेल्वे पोलिस कायम सतर्क असतात. याच पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिसांकडून गत वर्षभरात तब्बल १२ विशेष ऑपरेशन्स राबविण्यात आले. यात 'नन्हे फरिश्ते' ऑपरेशन अल्पवयीन मुलांसाठी देवदूत ठरले आहे. यात शिक्षणातील अपयश, प्रेमभंग, गरिबी, बेरोजगारी, कौटुंबिक अशा विविध कारणांनी आलेल्या निराशेतून रेल्वेस्थानकांत भटकत घर सोडलेल्या मुलांची विचारपूस करून, पोलिसांनी त्यांचे समुपदेशन करून कुटुंबाकडे त्यांना सुपूर्द केले आहे.
ही कारवाई केवळ कायदेशीर नव्हे, तर मानवी संवेदनशीलतेचे दर्शन घडवणारी ठरली आहे. दरम्यान, 'ऑपरेशन अनामत' अंतर्गत ९६ प्रवाशांचे तब्बल २३ लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले साहित्य त्यांना परत मिळवून देण्यात आले. रेल्वेस्थानकाच्या सुरक्षेसाठी सध्या ८६ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून, आणखी २६० कॅमेऱ्यांची मागणी करण्यात आली आहे.
प्रेमप्रकरणांतून पळणारेच अधिक
सध्या सोशल मीडियाचा वापर वाढल्याने अल्पवयीन मुले-मुली फसव्या प्रेमाला बळी पडत असून, वेळप्रसंगी आई-वडिलांना काहीही न सांगता घर सोडून जात आहेत. मात्र, आपण चुकीच्या आमिषांना बळी पडल्याचे कळाल्यानंतर निराश त्यांना रेल्वेस्थानकात अनेक दिवस काढावे लागतात. रेल्वे पोलिसांकडून अशाच मुलांना हेरून त्यांचे समुपदेशन करून त्यांना पुन्हा कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जाते.
रेल्वेस्थानकात संशयास्पद स्थितीत मुले-मुली आढळल्यास त्यांची तत्काळ चौकशी करून समुदेशन केले जाते. त्यांचा घराचा शोध घेऊन कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जाते. 'नन्हे फरिश्ते' अंतर्गत शेकडो मुलांना पालकांच्या ताब्यात दिले आहे. नागरिकांनी प्रवासादरम्यान काळजी घेतली पाहिजे तसेच रेल्वे नियमांचे पालक करावे. -नवीन प्रतापसिंह, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आरपीएफ