

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
नाशिकरोडच्या प्रभाग १७ मध्ये यंदाच्या महापालिका निवडणुकीत मतमोजणीदरम्यान एक आगळावेगळा आणि चर्चेचा विषय ठरणारा योगायोग समोर आला आहे. या प्रभागातील दोन वेगवेगळ्या गटांतून निवडणूक लढवलेल्या उमेदवारांना अचूक ९,९९९ मते मिळाल्याने राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे.
अनुसूचित जाती-जमाती राखीव गटातून भाजपचे उमेदवार प्रशांत दिवे यांनी निवडणूक लढवली. त्यांना नेमकी ९,९९९ मते मिळाल्याने ते विजयी ठरले. विशेष म्हणजे, याच प्रभागातील सर्वसाधारण गटातून शिवसेना (उबाठा) गटाचे शैलेंद्र ढगे यांनाही तितकीच म्हणजे ९,९९९ मते मिळाली आणि तेही विजयी झाले. एकाच प्रभागात, दोन वेगवेगळ्या गटांत, समान मतसंख्या मिळणे हा दुर्मीळ योगायोग मानला जात आहे.
या निकालानंतर "हा निव्वळ योगायोग की त्यामागे काही वेगळे गणित?" अशी चर्चा चांगलीच रंगली आहे. विशेष म्हणजे केवळ एक मत अधिक मिळाले असते तर ही संख्या थेट १० हजारांवर पोहोचली असती.
त्यामुळे "एक मतही किती मोलाचे असते" याचे हे जिवंत उदाहरण असल्याची प्रतिक्रिया मतदारांतून व्यक्त होत आहे. प्रभाग १७ चा हा निकाल लोकशाहीतील मतदानाच्या महत्त्वाची जाणीव करून देणारा ठरला असून, आगामी निवडणुकांमध्ये प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावायलाच हवा, असा संदेशही या अनोख्या योगायोगातून मिळत आहे.